भावनिक राजकारण की विकासाचेही बोलता? तीन वर्षांनंतर नागपुरात अधिवेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 08:54 AM2022-12-18T08:54:17+5:302022-12-18T08:54:28+5:30
सत्ताधारी आणि विरोधक भावनिक प्रश्नांवर एकमेकांशी भिडलेले असताना विधिमंडळही अशाच मुद्द्यांवरून कुस्तीचा आखाडा होणार असेल तर नडलेल्या, अडलेल्या, ग्रासलेल्या जनतेने कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न असेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भावनिक मुद्द्यांवरून सत्तापक्ष आणि विरोधक हमरीतुमरीवर आलेले असताना राज्य विधिमंडळाच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनातही भावनांचेच राजकारण दोन्ही बाजू करणार की विकासाच्या मुद्द्यांवर काही ठोस चर्चा, अन् घोषणा होणार, याकडे लक्ष लागले आहे.
तब्बल तीन वर्षांनंतर नागपुरात हे दोन आठवड्यांचे अधिवेशन होत आहे. सत्ताधारी आणि विरोधक भावनिक प्रश्नांवर एकमेकांशी भिडलेले असताना विधिमंडळही अशाच मुद्द्यांवरून कुस्तीचा आखाडा होणार असेल तर नडलेल्या, अडलेल्या, ग्रासलेल्या जनतेने कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न असेल.
नागपूरचे अधिवेशन म्हटले की विदर्भ, मराठवाडा येथील प्रश्न सुटण्याची अपेक्षा असते. त्यातच कोरोनाने सामान्यांचे कंबरडे मोडले, अनेकांचा रोजगार गेला, शेतकरी आत्महत्या वाढल्या. नागपुरातील उद्योग गुजरातमध्ये पळविल्याचा विषयही ताजा आहे. सध्याचे सरकार आणण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका असलेले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस विदर्भाला काय देतात, याबाबत कमालीची उत्सुकता आहे.
भावनिक जोडे बाहेर ठेवा, प्रश्न सोडवा
nभावनिक पेटवापेटवीच्या विषयांचे जोडे विधानभवनाच्या आठ दिवसांत तरी विधानभवनाच्या बाहेर ठेवा, दोन्ही सभागृहांत प्रश्नांवर चर्चा करा, सरकारला धारेवर धरा, अशी विरोधकांकडून अपेक्षा आहे.
nत्याचवेळी भावनिकतेत अडकण्यापेक्षा मायबाप सरकार काय देऊन जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूरकेंद्रित विदर्भ विकास आमगावपासून खामगावपर्यंत नेण्यासाठी काही नवीन घोषणा ते करतील हा कळीचा मुद्दाही आहेच.