सगळ्या पक्षाला संपवून तुम्हाला एकट्याला जिवंत राहायचंय का?; रामदास कदमांचा भाजपाला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 08:24 AM2024-03-02T08:24:56+5:302024-03-02T08:27:23+5:30
गेल्या काही वर्षांपासून या मतदारसंघावर उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचा डोळा आहे
मुंबई - Shivsena Ramdas Kadam on BJP ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती, आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. परंतु अजूनही काही जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. त्यात कोकणातील रत्नागिरी - सिंधुदुर्ग या जागेवर भाजपा-शिवसेना दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. उदय सामंत यांनी ज्या जागेवर शिवसेनेचा खासदार आहे त्या जागेवर आमचा दावा आहे असं म्हटलं. त्यानंतर नारायण राणेंनी रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा भाजपाची असून इथं भाजपाचा उमेदवार देऊ असं सांगितले. त्यावरून आता रामदास कदमांनी निशाणा साधला आहे.
शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले की, रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे विद्यमान खासदार हे शिवसेनेचे आहेत. तुम्हाला सगळ्या पक्षाला संपवून एकट्या भाजपाला जिवंत राहायचं आहे का? असा निष्कर्ष निघेल. कुठल्याही परिस्थितीत रत्नागिरीची जागा आम्ही सोडणार नाही. आम्ही ती जागा लढवणार. आता जे खासदार आहेत त्यांची शेवटची सभा मी घेतली होती. ही आमच्या हक्काची जागा आहे ती का सोडायची? असा सवाल त्यांनी केला.
तसेच आमच्यात अजिबात फूट पडणार नाही. प्रत्येकाला माझा पक्ष मोठा झाला पाहिजे असं वाटते. त्यामुळे जमलं तर जमलं असा प्रयत्न करायला कुणाची हरकत नसते. माझे ते माझे आणि तुझे तेही माझे असं कधी होत नसते असा टोलाही रामदास कदमांनी भाजपाला लगावला आहे.
गेल्या काही वर्षांपासून या मतदारसंघावर उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचा डोळा आहे. तर राणे पुत्र काही केल्या हा मतदारसंघ सोडायला तयार नाहीत. राज्यसभा निवडणुकीत नारायण राणेंना उमेदवारी न दिल्याने या मतदारसंघातून त्यांनाच उभे केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. यावरून शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेचाच हा मतदारसंघ असल्याची वक्तव्ये केली होती. यावर नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले होते. आता रामदास कदमांनी भाजपाला सवाल केला आहे.