दरोडेखोरांचा हल्ला; सहा पोलीस जखमी डहाणूतील घटना : दोघांना पकडले
By admin | Published: December 6, 2014 03:05 AM2014-12-06T03:05:07+5:302014-12-06T03:05:07+5:30
डहाणू तालुक्यातील आंबोली येथे महामार्गावर शुक्रवारी पहाटे दरोडेखोरांना पकडताना झालेल्या झटापटीत पोलीस निरीक्षकासह सहा पोलिसांना मार लागला आहे.
कासा : डहाणू तालुक्यातील आंबोली येथे महामार्गावर शुक्रवारी पहाटे दरोडेखोरांना पकडताना झालेल्या झटापटीत पोलीस निरीक्षकासह सहा पोलिसांना मार लागला आहे. मात्र पाच दरोडेखोरांपैकी दोघांना पोलिसांनी पकडले आहे, तर इतर तिघे जण पळून गेले.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सतत पडणारे दरोडे व लुटमारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कासा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक रवि मगर यांनी एका खासगी लक्झरीमध्ये सापळा रचला होता. पहाटे २च्या सुमारास महामार्गावरील आंबोली (कोटबीपाडा) येथे टायर पंक्चर झाल्याचे नाटक करून बस थांबविण्यात आली. त्या वेळी दबा धरून बसलेले दोन दरोडेखोर तेथे आले आणि त्यांनी साध्या वेशातील महिला पोलिसांना दमदाटी करीत एकीच्या गळ््यातील सोन्याची चेन खेचून घेतली. त्यानंतर लगेचच इतर तीन दरोडेखोर तिथे आले आणि त्यांनी महिलांकडे दागिने व पैशांची मागणी केली. त्या वेळी साध्या वेशातील पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.
या वेळी झालेल्या झटापटीत रवि मगर यांच्या डोक्याला व हाताला जबर मार लागला आहे. त्यांच्यावर कासा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर संगीता कहार, पूनम भामरे, पदमा अहीर तसेच हरी जाधव, पांडुरंग गवळी, शशी पाटील हे पोलीसही जखमी झाले.