‘किसान सन्मान’ योजनेतून डॉक्टर, वकील, इंजिनीअर बाद, ६००० रुपये साहाय्याचे निकष
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 04:49 AM2019-02-07T04:49:50+5:302019-02-07T04:50:21+5:30
दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्यावतीने पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत दरवर्षी तीन टप्प्यांत सहा हजारांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
- गजानन मोहोड
अमरावती - दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्यावतीने पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत दरवर्षी तीन टप्प्यांत सहा हजारांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. याबबतचे निकष राज्य शासनाने मंगळवारी जारी केले. यामध्ये डॉक्टर, इंजिनीअर, वकील, सनदी लेखापाल, वास्तुशास्त्रज्ञ व ज्यांनी गतवर्षी प्राप्तिकर भरला त्या व्यक्ती अपात्र ठरणार आहेत.
दरम्यान, मंगळवारी राज्याचे मुख्य सचिवांनी व्हिसीद्वारे सर्व जिल्हाधिकारी, सीईओ व कृषी विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला व योजनेची अंमलबजावणी प्राधान्याने करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत शासनाने कालबद्ध कार्यक्रम दिलेला असून, २६ फेब्रुवारीच्या आत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश सर्व जिल्ह्यांना दिले.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली सीईओ, एसएओ, आरडीसी, डीडीआर, एलडीएम व डिस्ट्रीक्ट डोमेन एक्सपर्टची समिती राहील. तालुकास्तरावर एसडीओंच्या अध्यक्षतेखाली एसडीओ (कृषी) तहसीलदार, बीडीओ, एआर यांची समिती, तर गावस्तरावर तलाठ्याच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक, कृषी सहायक तसेच विकास सोसायटींचे सचिवांची समिती अंमलबजावणी करेल. योजनेसाठी शेतकºयांचा आधार, मोबाइल व बँक खाते क्रमांक अचूक असणे महत्त्वाचे आहे. ही माहिती संकलित करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची असणार आहे.
चतुर्थ श्रेणी कर्मचारी सोडून सर्व अपात्र
केंद्राच्या या मदतीसाठी संवैधानिक पदधारणा केलेले आजी-माजी व्यक्ती, आजी-माजी लोकसभा व राज्यसभेचे खासदार, आजी-माजी मंत्री, आमदार, महापौर, आजी-माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अपात्र आहेत. केंद्र व राज्य शासन तसेच अंगीकृत निमशासकीय संस्थांचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे चतुर्र्थश्रेणी कर्मचारी सोडून सर्व अधिकारी व कर्मचारी अपात्र राहणार आहेत. ज्यांना निवृत्तीवेतन दहा हजारांपेक्षा कमी आहे, अशी व्यक्ती लाभार्थी राहतील.