सायन रुग्णालयात पुन्हा डॉक्टरांना धक्काबुक्की, संप चिघळला
By admin | Published: March 23, 2017 08:37 AM2017-03-23T08:37:17+5:302017-03-23T08:37:17+5:30
सायन रुग्णालयात पुन्हा एकदा निवासी महिला डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला केल्याने डॉक्टरांच्या संपाचे प्रकरण चिघळले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - सायन रुग्णालयात पुन्हा एकदा निवासी महिला डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला केल्याने डॉक्टरांच्या संपाचे प्रकरण चिघळले आहे. डॉक्टरांसाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात येतील, असे आश्वासन राज्य सरकारने दिल्यानंतर तीन दिवसांपासून पुकारलेला संप निवासी डॉक्टरांनी बुधवारी मागे घेतला, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली होती. पण प्रत्यक्षात डॉक्टर कामावर परतले नसून, संपाचा आज चौथा दिवस आहे.
या संपामध्ये आता राज्यभरातील खासगी डॉक्टरही सहभागी झाल्याने राज्यातील हजारो गरीब रुग्णांचे हाल होत आहेत. बुधवारी रात्री सायन रुग्णालयात बाळाची आई आणि आजीमध्ये बाळावर सुरु असलेल्या उपचारांवरुन वाद सुरु होता. त्यावेळी निवासी महिला डॉक्टरने हस्तक्षेप करुन बाळाला उपचाराची गरज असल्याचे नातेवाईकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण रुग्णाच्या नातेवाईकांनी उलट महिला डॉक्टरलाच धक्काबुक्की केली. या प्रकरणी तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
डॉक्टरांबरोबर झालेल्या या गैरवर्तणुकीमुळे प्रकरण चिघळले असून सरकार फक्त आश्वासन देतयं जो पर्यंत पूर्ण सुरक्षा मिळणार नाही तो पर्यंत कामावर परतणार नाही अशी आक्रमक भूमिका डॉक्टरांनी घेतली आहे.
गेल्या काही दिवसांत मुंबई, धुळे, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद येथे रुग्णांच्या नातेवाइकांकडून निवासी डॉक्टरांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या. याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले होते. मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी संपकरी डॉक्टरांवर ताशेरे ओढले होते. तर, बुधवारी राज्य शासनाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. अनेक डॉक्टरांना निलंबित केले तर, अनेकांना नोटिसा बजावल्या. तसेच रात्री आठ वाजेपर्यंत कामावर रुजू व्हा, अन्यथा ६ महिन्यांचा पगार कापला जाईल, असा इशाराही डॉक्टरांना राज्य सरकारकडून देण्यात आला होता.
Mumbai: Resident doctor at Sion Hospital allegedly attacked by a patient's relatives last night; Police complaint registered against 3 women pic.twitter.com/v35sujaIAN
— ANI (@ANI_news) March 23, 2017