डॉक्टर दाम्पत्याची गळा चिरून हत्या
By admin | Published: December 21, 2015 02:17 AM2015-12-21T02:17:08+5:302015-12-21T09:30:47+5:30
डॉक्टर दाम्पत्याची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना इस्लामपूर शहरातील जावडेकर चौकात रविवारी सकाळी उघडकीस आली.
सांगली : डॉक्टर दाम्पत्याची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना इस्लामपूर शहरातील जावडेकर चौकात रविवारी सकाळी उघडकीस आली. डॉ. प्रकाश वामन कुलकर्णी (६५) आणि डॉ. अरुणा (५८) असे मृत दाम्पत्याचे नाव असून, हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
डॉ. कुलकर्णी यांचे ‘धरित्री क्लिनिक’ नावाचे रुग्णालय आहे. याच इमारतीच्या वरील भागात त्यांचे निवासस्थान असून, घरी फरशी बसवण्याचे काम सुरू होते. परिचारिका सीमा यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ९ वाजता प्रसुतीसाठी एक रुग्ण आल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांच्या मोबाइलवर, शयनगृहातील दूरध्वनीवर संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
रविवारी सकाळी स्मिता यादव या पुन्हा ड्युटीवर आल्यावर दुधाची पिशवी, वृत्तपत्र खालीच पडल्याचे त्यांना दिसले. त्यांनी वर जाऊन दारावरची बेल वाजवली. मात्र, आतून प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून त्यांनी रुग्णालयातील इतर डॉक्टर व कर्मचाऱ्यांना बोलावले. त्यांनी धक्का देऊन दरवाजा उघडल्यावर, अरुणा या स्वयंपाकगृहात, तर प्रकाश कुलकर्णी हे शयनगृहातील पलंगाच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. पहिल्या मजल्यावरील दरवाजाची जाळी कापून आत आलेल्या हल्लेखोरांनी प्रकाश यांच्यावर १७ वार केल्याचे दिसत होते, तर डॉ. अरुणा यांच्या गळ्यावर तीन वार करण्यात आले होते. रक्ताने माखलेल्या पावलांनीच हल्लेखोरांनी पाठीमागील गच्चीवरून उड्या मारून शेतातून पलायन केले. शनिवारी रात्री १० पूर्वीच या डॉक्टर दाम्पत्याची हत्या झाली असून, हल्लेखोर हे माहीतगार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. कुलकर्णी दाम्पत्याच्या पश्चात मुलगा डॉ. आदित्य व स्नूषा डॉ. रचना असा परिवार आहे. डॉ. आदित्य हा बेळगाव येथे डी. एम. न्युरोचे शिक्षण घेत आहे, तर त्याची डॉ. रचना ही बेळगाव के.एल.ई. येथे नोकरीस आहे. (वार्ताहर)
या घटनेतील हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी वैद्यकीय व्यावसायिकांनी केली आहे. सोमवारी या हत्येच्या निषेधार्थ सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवून मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ठसे सापडले नाहीत ! : हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी लुसी श्वानाला पाचारण करण्यात आले. लुसीने पाठीमागील शेतातून रुग्णालयासमोरच्या रस्त्यापर्यंत माग काढला. घटनास्थळी आलेल्या ठसे तज्ज्ञांनाही हल्लेखोरांचा कोणताही ठसा मिळवण्यात यश आले नाही.