दंत चिकित्सेचे माहेरघर
By admin | Published: May 1, 2017 05:21 AM2017-05-01T05:21:04+5:302017-05-01T05:21:04+5:30
सरकारी दवाखाने म्हटले की अंगावर काटा येतो. सर्वत्र पसरलेली घाण, डॉक्टरांची अनास्था आणि उपचारासाठी तासन्तास तिष्ठत बसलेले रुग्ण
अतुल कुलकर्णी / मुंबई
सरकारी दवाखाने म्हटले की अंगावर काटा येतो. सर्वत्र पसरलेली घाण, डॉक्टरांची अनास्था आणि उपचारासाठी तासन्तास तिष्ठत बसलेले रुग्ण. हे चित्र कोणत्याही जिल्ह्याच्या रुग्णालयात नवे नाही. मात्र पुण्याचे ससून हॉस्पिटल, मुंबईतले जे. जे. हॉस्पिटल यांनी आपापल्यापरीने काही ना काही चांगले करण्याचा चालवलेला प्रयत्न ही या सगळ्यात दिलासा देणारी गोष्ट. अशीच ही चांगली गोष्ट आहे, मुंबईच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाची.
थ्रीडी तंत्रज्ञान वापरणारे हे देशातले एकमेव दंत महाविद्यालय असून त्यासाठी या महाविद्यालयास थ्रीडी ट्रीनिटी पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे. आज एक मेच्या निमित्ताने अशा चांगल्या उपक्रमाची कौतुकाने दखल घ्यावी असे हे काम आहे.
वर्षाला येथे अडीच ते तीन लाख रुग्ण तपासणी व उपचाराचा फायदा घेत आहेत. भारतीय दंत परिषदेच्या मानकानुसार बी.डी.एस. पदवी, व एम.डी.एस. पदव्युत्तर शिक्षण देणारी देशातील ही सर्वात पहिली संस्था आहे. आज या ठिकाणी दररोज ४०० नवीन रुग्णांची तपासणी होते तर रोज १५०० रुग्णांवर वेगवेगळ्या प्रकाराचे दंतोपचार केले जात आहेत. रुट कॅनल, दंत भरण, दात काढणे, लहान मोठ्या शस्त्रक्रिया, दाताच्या स्वच्छतेपासून ते हिरड्यांची शस्त्रक्रिया, संपूर्ण कवळी काढता घालता येणारे तंत्रज्ञान, कृत्रीम दात बसवणे, वेडेवाकडे दात सरळ करणे आदी उपचार येथे होतात.
आज अनेक आयएएस, आयपीएस अधिकारी, मंत्री, आमदार या डेन्टल कॉलेजचे नियमित पेशंट आहेत. त्यापेक्षा जमेची बाजू आणखी कोणती हवी. येथे असणारे डीन डॉ. मानसिंग पवार आणि त्यांची टीम ज्या जिद्दीने हे काम करत आली आहे आणि त्याहीपेक्षा ज्या आपलेपणाने येथे शिकणारे विद्यार्थी रुग्णांची तपासणी करताना दिसतात. त्याचे एक मेच्या निमित्ताने कौतुक करायचे नाही तर कधी करायचे...?
कॅडकॅमचा दीड हजारांना फायदा
कॉम्प्युटर अॅडेड डिझाईन आणि कॉम्प्युटर अॅडेड मशिनींग याला कॅडकॅम म्हणतात. त्याचा वापर नकली दात बनवण्यासाठीची ही यंत्रणा आत्ता कुठे खाजगी दवाखान्यांमधून येत असताना शासकीय दंत महाविद्यालयात आजपर्यंत त्याचा फायदा दीड हजार रुग्णांनी घेतला आहे. सिरॅमिकचे कृत्रीम दात तयार करणारी ही यंत्रणा आहे. दातांचा कर्करोग तपासण्यासाठी व्हिलोस्कोपची यंत्रणा येथेच आहे. डिजीटल डेन्टल सिम्युलेटर ही विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी व चाचणीसाठीची यंत्रणा देशात याच एका शासकीय दंत महाविद्यालयात आहे. डेंटल लेझर, पेन्टा हेड मायक्रोस्कोप या गोष्टी आमच्याकडे आहेत असे अधिष्ठाता डॉ. मानसिंग पवार अभिमानाने सांगतात. येत्या काळात ओरल कॅन्सर, ट्रॉमा केअरची देखील सुरुवात या ठिकाणी केली जाणार असून त्या दृष्टीने हे कॉलेज काम करत असल्याचे ते म्हणाले.