‘डॉक्टरांनो, कमिशनला नाही म्हणा’
By Admin | Published: July 16, 2017 01:17 AM2017-07-16T01:17:52+5:302017-07-16T01:17:52+5:30
कट प्रॅक्टिसविरोधात कायदा करण्यासाठी राज्य शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. विविध स्तरांतून डॉक्टर्स आता कट प्रॅक्टिसला विरोध दर्शविण्यासाठी पुढाकार घेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कट प्रॅक्टिसविरोधात कायदा करण्यासाठी राज्य शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. विविध स्तरांतून डॉक्टर्स आता कट प्रॅक्टिसला विरोध दर्शविण्यासाठी पुढाकार घेत असताना, इंडियन मेडिकल असोसिएशननेही याला विरोध केला आहे. कट प्रॅक्टिस बंद झाल्यास आरोग्यसेवेवरील आर्थिक भार कमी होईल, असे सांगत रुग्णांनाही दिलासा मिळेल, अशी आशा इंडियन मेडिकल असोसिएशनने व्यक्त केली.
कट प्रॅक्टिसविरोधी कायदा तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने, प्राथमिक मसुद्याची तयारी सुरू केली आहे. आरोग्यसेवा क्षेत्रात ‘कट प्रॅक्टिस’ ही गंभीर समस्या आहे. त्यामुळे संबंधित कायद्यासाठी त्वरित हरकती व सूचना पाठवाव्यात, असे आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.रवी वानखेडकर यांनी सांगितले. डॉक्टरांनी सूचना कराव्यात आणि या कट प्रॅक्टिसच्या व्हायरसला नष्ट करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनने केले आहे.