मराठमोळ्या डॉक्टर रखमाबाई राऊत यांना गूगलची डूडलमधून मानवंदना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 09:25 AM2017-11-22T09:25:50+5:302017-11-22T09:57:48+5:30
गूगल नेहमीचं डूडलच्या माध्यमातून महान व्यक्ती, महत्त्वाच्या घटनांना मानवंदना देत असते. गूगलने आज डूडलच्या माध्यमातून अशाच एका महान व्यक्तीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
मुंबई- गूगल नेहमीचं डूडलच्या माध्यमातून महान व्यक्ती, महत्त्वाच्या घटनांना मानवंदना देत असते. गूगलने आज डूडलच्या माध्यमातून अशाच एका महान व्यक्तीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. भारतीय वैद्यकीय क्षेत्रात बहुमोल कामगिरी करणाऱ्या डॉ. रखमाबाई राऊत यांना गूगलने डूडलच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे. पहिल्या महिला भारतीय डॉक्टर रखमाबाई राऊत यांची आज 153 वी जयंती असून त्यानिमित्त गूगलने खास डूडल तयार करून त्यांच्या कामाचा गौरव केला आहे.
मराठमोळ्या डॉ. रखमाबाई राऊत या भारतात वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर होत. ज्या काळात महिलांना दुय्यम स्थान दिलं जात होतं, अशा काळात रखमाबाई राऊत यांनी परिस्थितींवर मात करुन यशाचं शिखर गाठलं. रखमाबाई राऊत यांना रुक्माबाई या नावानंही ओळखलं जातं. ब्रिटीश काळातील त्या पहिल्या महिला भारतीय डॉक्टर होत्या. त्यांनी रुग्णांची सेवा केलीच पण भारतीय महिलांच्या अधिकारासाठीही संघर्ष केला होता. बालविवाह प्रथा बंद होण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान भारतीय इतिहासात मैलाचा दगड ठरलेलं आहे.
रखमाबाई यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1864 रोजी मुंबईत झाला. रखमाबाई यांच्या आईचा बालविवाह झाला होता. वयाच्या 14 व्या वर्षी रखमाबाईंच्या आईचं म्हणजे जयंतीबाईंचं लग्न झालं होतं, 15 व्या वर्षी रखमाबाईंच्या रुपाने मुलगी झाली आणि 17 व्या वर्षी त्यांचा पती म्हणजे रखाबाईंच्या वडिलांचे निधन झालं. जयंतीबाई अवघ्या 17 वर्षाच्या असताना त्यांच्या पतीचं निधन झालं आणि रखमाबाईंच्या डोक्यावरील पितृछत्र हरपलं. पुढे जयंतीबाईंनी डॉ. सखाराम राऊत यांच्याशी दुसरं लग्न केलं.
आईप्रमाणेच रखमाबाई यांचाही बालविवाह झाला. रखमाबाईंचा वयाच्या 11 व्या वर्षी दादाजी भिकाजी यांच्याशी विवाह झाला. मात्र त्यांनी माहेरी राहून वैद्यकीय शिक्षण घेतलं.
मार्च 1884 मध्ये दादाजी यांनी मुंबई हायकोर्टात वैवाहिक हक्कासाठी याचिका दाखल केली आणि रखमाबाईंनी त्यांच्यासोबत राहावं म्हणून मागणी केली. त्यावेळी, दादाजी यांच्यासोबत राहा किंवा तुरुंगात जा, असे कोर्टाने सांगितलं. अर्थात, रखमाबाईंनी तो निर्णय नाकारला आणि न्यायालयीन लढाई दिली.
पुढे हाच खटला लँडमार्क ठरला आणि 1891 मध्ये एज ऑफ कॉन्सेन्ट अॅक्ट अस्तित्त्वात आला. रखमाबाईंनी सुमारे 35 वर्षे यशस्वीरित्या वैद्यकीय सेवा दिली. त्याचसोबत, बालविवाहाच्या प्रथेविरोधात आणि महिलांच्या एकांतवासासंदर्भात लेखनही केलं. वयाच्या 91 व्या वर्षी रखमाई राऊत यांचं निधन झालं.