‘हिरानंदानी’चे डॉक्टरही संशयाच्या भोवऱ्यात
By admin | Published: July 19, 2016 05:23 AM2016-07-19T05:23:36+5:302016-07-19T05:23:36+5:30
किडनी प्रत्यारोपण रॅकेटप्रकरणी हिरानंदानी रुग्णालयातील डॉक्टरही संशयाच्या भोवऱ्यात
मुंबई : किडनी प्रत्यारोपण रॅकेटप्रकरणी हिरानंदानी रुग्णालयातील डॉक्टरही संशयाच्या भोवऱ्यात असून, या प्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. रुग्णालयाच्या अवयव प्रत्यारोपण समन्वयकाला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीत या साखळीचा उलगडा होणार आहे.
हिरानंदानी रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण रॅकेट उघडकीस येताच, मुंबईतील इतरही रुग्णालयांचे धाबे दणाणले आहे. आतापर्यंत समन्वयक नीलेश कांबळेसह या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली. नीलेशकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. त्याला रविवारी सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. सोमवारी गुन्हे शाखेच्या सहआयुक्तांसोबत या प्रकरणी पवई पोलिसांच्या तपास पथकासोबत बैठक झाली. पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांसह तपास अधिकारी या वेळी उपस्थित होते.
कांबळे यामागील मुख्य सूत्रधार असल्याचे समोर येत आहे. मात्र, वरिष्ठ डॉक्टरांना हाताशी धरून त्याने हा प्रताप केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कांबळेमार्फत आतापर्यंत ३५ प्रत्यारोपण झाल्याची माहिती समोर येत आहे.
३५ रुग्णालयांमध्ये प्रत्यारोपण
मुंबईतील एकूण ३५ रुग्णालयांनी अवयव प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली आहे. यात महापालिका, शासकीय आणि खासगी रुग्णालयांचा समावेश आहे.
>रुग्णालयात प्रत्यारोपण समन्वयकाचे काय काम असते?
मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा, १९९४ नुसार कोणत्याही रुग्णालयाला अवयव प्रत्यारोपण करण्याची परवानगी हवी असल्यास, त्या रुग्णालयात ‘अवयव प्रत्यारोपण समन्वयक’ नेमणे आवश्यक आहे. समन्वयक निवडल्यानंतर प्रत्यारोपणासाठी परवानगी दिली जाते. रुग्णालयात दोन प्रकारे अवयव प्रत्यारोपण केले जाते.
एक म्हणजे, मेंदू मृतावस्थेत असलेल्या व्यक्तीचे अवयव त्याच्या नातेवाईकाच्या संमतीने काढले जातात आणि विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या (झेडटीसीसी) प्रतीक्षा यादीत असणाऱ्या रुग्णांना अवयव दिले जातात.
तर दुसऱ्या पद्धतीत रुग्णाच्या नातेवाईकांचे अवयव घेतले जातात. या दोन्ही पद्धतीत समन्वयक महत्त्वाचा असतो. कारण रुग्ण, नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम हा समन्वयक करत असतो. रुग्णाच्या नातेवाईकांचे समुपदेशन करणे, डॉक्टरांशी संवाद साधणे, कागदपत्रांची पूर्तता करणे ही प्राथमिक पातळीवरची कामे हा समन्वयक करत असतो. त्याचबरोबर, ‘लाइव्ह ट्रान्सप्लांट’मध्ये कागदपत्रांची पूर्तता, त्याची फेरतपासणीचे कामही समन्वयक करतो.