रुग्णांना ओलीस धरणारे डॉक्टर असंवेदनशील - मुख्यमंत्री
By Admin | Published: March 25, 2017 12:32 AM2017-03-25T00:32:23+5:302017-03-25T00:32:23+5:30
हजारो रुग्णांना वाऱ्यावर सोडून असंवेदनशीलता दाखविणारे संपकरी डॉक्टर आणि त्यांना मारहाण करणारे लोक यांच्या मानसिकतेत
मुंबई : हजारो रुग्णांना वाऱ्यावर सोडून असंवेदनशीलता दाखविणारे संपकरी डॉक्टर आणि त्यांना मारहाण करणारे लोक यांच्या मानसिकतेत काय फरक आहे. जनतेच्या करांच्या पैशातून तुम्ही शिकलात, पैसाही घेता. त्यांना ओलीस धरण्याचा तुम्ही करीत असलेला प्रकार सहन केला जाणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मार्डच्या संपकरी डॉक्टरांना ठणकावले.
डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल होत असल्याच्या मुद्यावरून भाजपा-शिवसेनेच्या सदस्यांनी गदारोळ घातल्याने विधानसभेचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या संपावर निवेदन करताना संपकऱ्यांना अक्षरश: खडे बोल सुनावले. ते म्हणाले की, डॉक्टरांच्या सुरक्षिततेची हमी मी स्वत: मुख्यमंत्री म्हणून दिली. तातडीने उपाययोजनादेखील सुरू केल्या. या उपाययोजना १५ दिवसांच्या अमलात आल्या नाहीत तर मी वैद्यकीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा देईल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. कामावर परत या अशी विनंती आम्ही त्यांना वारंवार केली. त्यांच्या हातापायाही पडलो.
अजून काय हवे आहे? अजून किती संयम आम्ही दाखवायचा? या संपाबद्दल सभागृहाच्या आणि राज्यातील जनतेच्याही भावना तीव्र आहेत. डॉक्टर रुग्णांना वाऱ्यावर सोडतील पण सरकार तसे होऊ देणार नाही.
राज्य शासनाने डॉक्टरांसोबत वेळोवेळी बैठका घेतल्या. सर्व प्रकारची कारवाई करण्यासंदर्भात लेखी दिले. उच्च न्यायालयाने देखील संप मागे घेण्याबात निर्णय दिला. तरी देखील डॉक्टर कामावर रु जू झाले नाहीत. त्यांनी घेतलेल्या वैद्यकीय शपथेचा विसर पडलेला दिसतो. ज्या करदात्यांच्या पैशातून डॉक्टरांना शिक्षण दिले जाते त्याच सामान्य माणसाला उपचाराविना मरणासन्न अवस्थेत सोडून देणे कितपत योग्य आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, डॉक्टर शासनाचे, उच्च न्यायालयाचे ऐकायला तयार नाही. संधीचा फायदा घेऊन आपल्या मागण्या रेटण्याचे काम सुरु आहे. हे खपून घेतले जाणार नाही.जाणीवपूर्वक उपचार नाकारले जात असतील तर डॉक्टरांना जबाबदार का धरले जाऊ नये, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.डॉक्टरांनी संवेदनशीलता दाखविली नाही तर राज्य शासन हातावर हात धरु न बसणार नाही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. मुख्यमंत्र्यांच्याच निवेदनाचे भाजपा-शिवसेनेच्या सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले. समाजाने डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला आहे. मात्र डॉक्टरांची ही असंवेदनशीलता पाहून त्यांना दानवाची उपमा द्यायला नागरिकांना बाध्य व्हावे लागेल, अशी परिस्थिती डॉक्टरच निर्माण करीत आहेत.