इस्लामपुरात डॉक्टर दाम्पत्याचा खून

By admin | Published: December 21, 2015 12:01 AM2015-12-21T00:01:52+5:302015-12-21T00:27:55+5:30

जिल्हा हादरला : १७ वार करून गळे चिरले; अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू; कारण अस्पष्ट

Doctor-in-law blood donation in Islampur | इस्लामपुरात डॉक्टर दाम्पत्याचा खून

इस्लामपुरात डॉक्टर दाम्पत्याचा खून

Next

इस्लामपूर : शहरातील जावडेकर चौकातील डॉ. प्रकाश वामन कुलकर्णी (वय ६५) आणि डॉ. अरुणा प्रकाश कुलकर्णी (५८, रा. जावडेकर चौक, इस्लामपूर) या दाम्पत्याचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. शनिवारी रात्री दहा वाजण्यापूर्वीच या दाम्पत्याचा खून झाल्याचा अंदाज असून, या खुनाचे नेमके कारण रात्रीपर्यंत स्पष्ट झाले नव्हते. हल्लेखोर हे माहीतगार असून, त्यांनी रात्रीच्यावेळी इमारतीच्या पाठीमागील बाजूने इमारतीवर चढून हे कृत्य केले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. येथील जावडेकर चौकात डॉ. कुलकर्णी यांचे ‘धरित्री क्लिनिक’ नावाचे रुग्णालय आहे. इस्लामपूर मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष, विद्यमान सांस्कृतिक विभागप्रमुख म्हणून ते काम पाहत होते. तसेच वाचन चळवळ नेहमी सुदृढ राहावी यासाठी त्यांनी ‘मानस’ हे स्वत:चे वाचनालयही चालविले होते. अशा या डॉक्टर दाम्पत्याच्या खुनाने शहर हादरून गेले. घटनेचे वृत्त समजताच शहरातील बहुतांशी डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णालयासमोर गर्दी केली होती.डॉ. कुलकर्णी यांच्या घरी फरशी बसविण्याचे काम परप्रांतीय कामगारांकडून सुरू होते. रुग्णालयातील परिचारिका सीमा यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी एक वाजता त्यांची डॉक्टरांशी भेट झाली. दुपारी चारच्या सुमारास इतर डॉक्टर मित्रांबरोबर ते बाहेर हॉटेलमध्ये जाऊन चहापान करून आले. त्यानंतर साडेपाच वाजता दुसऱ्या परिचारिका सुचित्रा सोहत्रे यांच्याकडून कामगारांना चहा देऊन सुतार आल्यानंतर मला कळवा, तसेच आज प्रसूतीचे रुग्ण घेऊ नका, अशी सूचना त्यांनी केली. सायंकाळी सहाच्या सुमारास सुतार आले व काम पाहून डॉक्टरांशी आपले बोलणे झाले आहे, असे सांगत ते निघून गेले. रात्री नऊ वाजता प्रसूतीसाठी एक महिला रुग्ण आल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांच्या मोबाईलवर, शयनगृहातील दूरध्वनीवर संपर्क साधला. दाराची बेलसुद्धा वाजवली, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. रात्री दहा वाजता मंगल वाघमारे या परिचारिका कामावर आल्या आणि सीमा यादव या घरी गेल्या. त्यानंतर रात्री नऊ वाजता आलेली रुग्ण महिला पुन्हा रात्री साडेअकरा वाजता आली. त्यावेळी वाघमारे यांनी पुन्हा डॉक्टरांशी संपर्क केला. मात्र, तेव्हाही डॉक्टरांनी काही प्रतिसाद न दिल्याने वाघमारे यांनी रुग्णाला परत पाठवून दिले.रविवारी सकाळी पावणेदहा वाजता स्मिता यादव या पुन्हा कामावर आल्या. यावेळी त्यांना दुधाची पिशवी, वृत्तपत्र खालीच पडले असल्याचे दिसले. त्यावेळीही यादव यांनी वर जाऊन दारावरची बेल वाजवली. तरीही आतून प्रतिसाद मिळाला नाही. शेजारी राहणाऱ्या डॉ. विलास आफळे यांनीही कुलकर्णी यांना आवाज देऊन दरवाजा ठोठावला. दरम्यान, तेथील औषध विक्रेते नितीन सुतार यांना ही घटना समजताच त्यांनी डॉ. सतीश गोसावी, डॉ. सी. एस. मोरे यांना बोलावून घेतले. कुलकर्णी यांना हाका मारून दार वाजविले. त्यांनाही प्रतिसाद न मिळाल्याने सुतार यांनी जोरदार धक्का देऊन दार उघडले. त्यानंतर ही थरारक घटना उघडकीस आली. अरुणा या स्वयंपाकगृहात, तर प्रकाश कुलकर्णी हे शयनगृहातील पलंगाच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
या घटनेची माहिती रविवारी साडेदहाच्या सुमारास पोलिसांना देण्यात आली. पोलीस उपअधीक्षक वैशाली शिंदे, प्रभारी अधिकारी विश्वनाथ राठोड हे पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. पहिल्या मजल्यावरील दरवाजाची जाळी कापून दरवाजा उघडून आत आलेल्या हल्लेखोराने प्रकाश कुलकर्णी यांच्यावर अत्यंत त्वेषाने १७ वार केल्याचे दिसत होते. मानेवर, छातीवर, पाठीवर, पोटावर धारदार शस्त्राच्या खोलवर जखमा होत्या. शरीरावर अनेक ठिकाणी भोसकल्याच्या खुणा होत्या, तर अरुणा कुलकर्णी यांचा गळा चिरणारे तीन वार आणि डावा जबडा व दोन्ही हातांच्या पंजांवर जोरदार वार झाले होते. त्यांनी हल्लेखोराला प्रतिकार केल्याचे स्पष्ट दिसत होते. तेथून रक्ताने माखलेल्या पावलांनीच हल्लेखोरांनी पाठीमागील गच्चीवरून उड्या मारून शेतातून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच जावडेकर चौकात बघ्यांची गर्दी झाली. पोलीस कर्मचाऱ्यांना या गर्दीला पांगवावे लागत होते. दुपारी दीडच्या सुमारास दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
मृत प्रकाश कुलकर्णी यांचे धाकटे बंधू संदीप वामन कुलकर्णी यांनी सायंकाळी इस्लामपूर पोलिसांत फिर्याद दिली. कुलकर्णी दाम्पत्याच्या पश्चात मुलगा डॉ. आदित्य व स्नुषा डॉ. रचना असा परिवार आहे. डॉ. आदित्य हा बेळगाव येथे डी. एम. न्युरो या पदवीचे शिक्षण घेत होता, तर त्याची पत्नी डॉ. रचना ही के.एल.ई. येथे नोकरीस आहे.
(वार्ताहर)

जेवण करण्यापूर्वीच हल्ला
कुलकर्णी दाम्पत्य घराच्या वरच्या मजल्यावर होते. रात्री नऊनंतर त्यांचा संपर्क थांबला होता. स्वयंपाकगृहात अर्धवट शिजलेली भाजी होती, तर प्रकाश कुलकर्णी हे फक्त फॉर्मल पँटवर बेडरूममध्ये होते.
जेवण करून झोपी जाण्यापूर्वी
त्यांना लुंगी किंवा नाईट पँट घालण्याची सवय होती. त्यामुळे या दाम्पत्यावर रात्रीचे जेवण करण्यापूर्वीच हा जीवघेणा हल्ला झाल्याची शक्यता आहे.

इस्लामपुरात आज
डॉक्टरांचा मूकमोर्चा
जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी सायंकाळी इस्लामपूर येथे भेट देऊन पोलीस उपअधीक्षक वैशाली शिंदे यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. वाळवा-शिराळा उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांची वेगवेगळी पथके करून वेगवेगळ्या शक्यता गृहीत धरून तपास करण्याच्या सूचना दिल्या.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकही तपासात मदत करीत आहे. यावेळी शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी फुलारी यांची भेट घेऊन कुलकर्णी दाम्पत्याच्या खुनाबाबत संताप व भीती व्यक्त केली.
या घटनेतील हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. आज, सोमवारी या हत्येच्या निषेधार्थ सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवून मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सर्व शक्यता गृहीत
धरून तपास..!
डॉ. प्रकाश कुलकर्णी यांच्याविषयी शहरामध्ये आदर असल्याने या दाम्पत्याचा झालेला खून सर्वांचेच डोके सुन्न करणारा ठरला आहे. त्यांच्याविषयी कोणतीही अडचणीची ठरेल, अशी एकही बाब समोर येत नव्हती. त्यांचे सर्वांशी असणारे सलोख्याचे आणि मैत्रीचे संबंध यामुळे या घटनेबाबत पोलिसांनाही अंदाज बांधणे कठीण झाले होते. तरीही सर्व शक्यता गृहीत धरून तपास करणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक वैशाली शिंदे यांनी स्पष्ट केले.


श्वान घुटमळले..!
डॉक्टर दाम्पत्याचा खून झाल्यानंतर हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी लुसी श्वानाला पाचारण करण्यात आले. हल्लेखोरांनी तेथे कोणताही पुरावा ठेवला नव्हता. मृतांच्या शरीराचा वास दिल्यानंतर लुसीने पाठीमागील शेतातून रुग्णालयासमोरच्या रस्त्यापर्यंत माग काढला. त्यामुळे हल्लेखोरांचा मार्ग सापडला नाही. दरम्यान, घटनास्थळी आलेल्या ठसे तज्ज्ञांनाही हल्लेखोरांचा कोणताही ठसा मिळविण्यात यश आले नाही.

हल्लेखोर एकापेक्षा अधिक..!
धरित्री क्लिनिकच्या पहिल्या मजल्यावरील खोल्यांमध्ये कुलकर्णी दाम्पत्यावर हल्ला झाल्याची खबर तळमजल्यावर असणाऱ्या परिचारिकांनाही समजली नाही. हल्ला होत असताना आरडाओरडा झाला असला, तरी तो कुणालाही ऐकू आलेला नाही. त्यामुळे या घटनेत हल्लेखोरांची संख्या एकापेक्षा अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

किमती साहित्य तिथेच
कुलकर्णी दाम्पत्याच्या अंगावरील दागिने आणि घरातील अन्य किमती साहित्य व वस्तू जिथल्या तिथे होत्या. त्यामुळे हल्लेखोरांचा चोरीचा उद्देश नव्हता, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे घटनेचे गूढ वाढले आहे. दीड महिन्यापूर्वी कुलकर्णी यांच्या घरातून दोन मोबाईलही चोरीला गेले होते. त्याबाबतचा गुन्हाही पोलिसांत नोंद आहे. कालची घटना घडल्यानंतरही दाम्पत्याचे मोबाईल चोरीला गेल्याची चर्चा होती. पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.

Web Title: Doctor-in-law blood donation in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.