डॉक्टर आॅक्सिजनवर!
By admin | Published: July 7, 2014 01:12 AM2014-07-07T01:12:52+5:302014-07-07T01:12:52+5:30
महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेच्या (मॅग्मो) नेतृत्वात पुकारलेल्या असहकार आंदोलनात सहभागी झालेल्या आणखी २० अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मेस्माअंतर्गत
८९ डॉक्टरांवर कारवाई : मॅग्मो’चे असहकार आंदोलन
नागपूर : महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेच्या (मॅग्मो) नेतृत्वात पुकारलेल्या असहकार आंदोलनात सहभागी झालेल्या आणखी २० अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मेस्माअंतर्गत त्यांची सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली. आरोग्य विभागाने आतापर्यंत ८९ वैद्यकीय अधिकाऱ्यांना घरी बसविले आहे. उद्या सोमवारी आंदोलनकर्त्यांवर मेस्मा लावून अटक करण्याची दाट शक्यता आहे. कालपर्यंत ‘मेस्मा’ची नोटीस बजावणारे आरोग्य विभागाच्या वर्ग ‘अ’चे अधिकारीही सोमवारपासून या आंदोलनात सहभागी होणार आहे.
‘मॅग्मो’च्या नेतृत्वात मंगळवारपासून सुरू झालेले हे आंदोलन आता पूर्णत: चिघळले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य सेवा ठप्प पडली आहे. रुग्ण मेयो, मेडिकल व डागा रुग्णालयाकडे वळल्याने ही तीनही रुग्णालये फुल्ल झाली आहेत. याचा परिणाम रुग्णसेवेवर पडला आहे. प्रसूती आणि शवविच्छेदन हे विभाग प्रभावित झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नावाडे यांनी मेस्मा अंतर्गत गुरुवारपासून कारवाईची नोटीस बजावणे सुरू केले होते. परंतु सोमवारपासून हे तीनही अधिकारी आंदोलनात सहभागी होणार आहेत. रविवारी डॉ. नावाडे आणि डॉ. सवई यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली. यामुळे उद्यापासून हे आंदोलन वेगळे वळण घेण्याची स्थिती आहे.
आंदोलनाच्या आज सहाव्या दिवशी एमबीबीएसचे (गट अ) चार आणि बीएमएसचे (गट ब ) १६ अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली. शनिवारी पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचा आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले होते. आतापर्यंत ८९ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड चालविण्यात आली आहे. आंदोलनाचे नेतृत्व डॉ. हरीष महंत, डॉ. सोनाली किरडे,डॉ. ईरफान अहमद, डॉ. ममता सोनसरे, डॉ. हर्षवर्धन मानेकर यांच्यासह अनेकांनी केले.
नोटीस बजावणारेच आंदोलनात
आंदोलनात सहभागी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मेस्माची नोटीस बजावणारे आरोग्य विभागाचे वर्ग ‘अ’चे अधिकारीच सोमवारपासून आंदोलनात सहभागी होणार आहे. त्यांच्या विविध संघटनांनी ‘मॅग्मो’च्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यात आरोग्य विभागाचे उपसंचालक, सहसंचालक, अतिरिक्त सहसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, विशेषतज्ज्ञ, वैद्यकीय अधीक्षक, उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
रुग्णच नाहीतर मृतदेहाचेही हाल
मॅग्मोच्या या आंदोलनाचा फटका रुग्णांसोबतच शवविच्छेदनसाठी येणाऱ्या मृतदेहाला बसत आहे. रविवारी कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नातेवाईक मृतदेह घेऊन आले. परंतु येथील इंटर्न डॉक्टरांनी नातेवाईकांना शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयाकडे बोट दाखविले. याला घेऊन नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचे समजते. शवविच्छेदन होत नसेल तर उघडे कशाला ठेवता, असा प्रश्नही नातेवाईकांनी केला.
अटकेसाठी ‘मॅग्मो’ तयार
रविवारी दुपारी ३ वाजता मेस्माअंतर्गत आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात येईल, अशी चर्चा सुरू होती. सदर पोलीस ठाण्यातून काही पोलिसांनी आंदोलन स्थळाला भेट दिली. आंदोलनामध्ये सहभागी डॉक्टरांची यादीही तयार करून घेतली होती. परंतु नंतर ते आलेच नाही. आम्ही स्वत: पोलीस ठाण्यात जाण्याची तयारी दाखविली. परंतु पोलिसांनी याला नकार दिला. आम्ही कधीही स्वत:ला अटक करून घेण्यास तयार आहोत, असे मॅग्मोचे जिल्हा अध्यक्ष डॉ. विद्यानंद गायकवाड म्हणाले.