डॉक्टर महिलेवर क्लिनिकमध्ये अतिप्रसंगाचा प्रयत्न
By Admin | Published: July 24, 2016 08:51 PM2016-07-24T20:51:43+5:302016-07-24T20:51:43+5:30
डॉक्टर महिलेचा पाठलाग करणाऱ्या एका नराधमाने चक्क तिच्या क्लिनिकमध्ये जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 24 - डॉक्टर महिलेचा पाठलाग करणाऱ्या एका नराधमाने चक्क तिच्या क्लिनिकमध्ये जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना २३ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पडेगाव येथील गोल्फ क्लबजवळ घडली. पोलिसांनी याप्रकरणी अफरोज अब्दुल रहेमान कुरेशी (रा. शहागंज) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, ३२ वर्षीय पीडिता डॉक्टर महिलेचा पडेगाव येथे दवाखाना आहे. अफरोज आणि ती एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तो सहा ते सात महिन्यांपासून तिचा सतत पाठलाग करीत होता. तिला फोन करणे, मेसेज पाठविणे तर त्याचे नित्याचेच झाले होते. त्याचा दुष्ट हेतू लक्षात येताच पीडितेने त्याची समजूत काढून यापुढे मला तुझ्यासोबत बोलायचे नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. मात्र, तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्यानंतरही तो तिच्या मागावरच राहत होता. २३ जुलै रोजी दुपारी पीडिता तिच्या दवाखान्यात एकटी बसलेली असताना तो तेथे गेला. यावेळी त्याने तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न करून क्लिनिकची तोडफोड केली. तिला जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. तिने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील लोक जमा झाले. कोणी तरी छावणी पोलिसांना घटनेची माहिती दिली. लोक जमा होत असल्याचे पाहून तो तेथून पसार झाला. या घटनेनंतर पीडितेने अफरोजविरोधात छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक रेश्मा सौदागर तपास करीत आहेत.