डॉक्टरांचा संप बेतला सहा महिन्याच्या बाळाच्या जीवावर ?
By admin | Published: July 3, 2015 01:35 PM2015-07-03T13:35:49+5:302015-07-03T16:01:09+5:30
वेतनवाढीच्या मागणीसाठी निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप आता रुग्णांच्या जीवावर बेतू लागला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - वेतनवाढीच्या मागणीसाठी निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप आता रुग्णांच्या जीवावर बेतू लागला आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयात डॉक्टरांच्या उपचाराअभावी सहा महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे.
वेतनवाढी व अन्य १० मागण्यांसाठी राज्यभरातील सुमारे साडे चार हजार निवासी डॉक्टर गुरुवारपासून संपावर आहेत. याचा फटका रुग्णांना बसत आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे व निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या पदाधिका-यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेत तावडेंनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र सरकारने तोंडी आश्वासन देण्याऐवजी लेखी परिपत्रक काढावे अशी मागणी करत मार्डने संप सुरु ठेवला. उल्हासनगरमधील एक दाम्पत्त्य त्यांच्या लहान बाळाला घेऊन केईएम रुग्णालयात आले होते. मात्र डॉक्टर नसल्याने त्या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे.