केईएम रुग्णालयात डॉक्टरांना सळईने मारहाण, संतप्त डॉक्टर संपावर
By admin | Published: September 25, 2015 11:14 AM2015-09-25T11:14:41+5:302015-09-25T12:10:33+5:30
केईएम रुग्णालयात एका रुग्णाच्या नातेवाईकांनी तीन डॉक्टरांना सळईने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून संतप्त डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - केईएम रुग्णालयात एका रुग्णाच्या नातेवाईकांनी तीन डॉक्टरांना सळईने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून संतप्त डॉक्टर आज सकाळपासून कामबंद आंदोलनावर आहेत. डॉ. सुहास, डॉ. कुशाल व डॉ. पुनित यांना ५-६ इसमांनी लोखंडी स्टूल, सळई व लाकडाने मारहाण केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनेंतर मार्डने बेमुदत राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे.
काल रात्री साडेआठच्या सुमारास रुग्णालयात दोन वर्षांचे एक डेंग्यूग्रस्त बाळ आणण्यात आले, त्याची प्रकृती अतिशय नाजूक होती. मात्र आयसीयूमध्ये दाखल करण्यास जागा नसून त्या बाळाची प्रकृती खालावत असल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगण्यात आले. त्यावर नातेवाईकांनी बाळाला जनरल वॉर्डमध्ये ठेवण्याचा आग्रह केला. अखेर नातेवाईकांच्या काही महत्वाच्या फॉर्म्सवर सह्या घेऊन डॉक्टरांनी बाळाला रुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार सुरू केले. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास बाळाची प्रकृती खूपच बिघडली हे पाहून बाळाचे वडील व ५-६ नातेवाईकांनी सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केली व त्यानंतर डॉक्टरांवरच हल्ला चढवला. त्यांना सळई, स्टूलच्या सहाय्याने बेदम मारहाण केली ज्यात तीन डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संतापलेल्या डॉक्टरांनी आज कामबंद आंदोलन केले असून मार्ड संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
डॉक्टर हे पेशंटचा जीव वाचवण्यासाठी असता, त्यांच्या जीवाचे बरं-वाईट करण्यासाठी नव्हे हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. ज्याचं कामं तुमचा जीव वाचवणं हे असतं त्यालाच मारहाण करणं हे कुठल्या तत्वात बसतं असा सवाल विचारात डॉक्टरांनी या घटनेचा निषेध केला आहे. याआधीही मारहाणीच्या अशा घटना घडल्या असून त्यासाठी जबाबदार असलेले लोक अद्यापही मोकाट फिरत आहेत, असे सांगत संपूर्ण सुरक्षा मिळेपर्यंत कामावर परतणार नसल्याची ठाम भूमिका डॉक्टरांनी घेतली आहे.