डॉक्टर संपावर; रुग्ण वाऱ्यावर, शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाला दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचे राज्यात पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 07:39 AM2022-02-05T07:39:13+5:302022-02-05T07:39:54+5:30
Doctor Strike: वैद्यकीय शिक्षण सचिव विजय सौरभ यांनी राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाला गुरुवारी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचे पडसाद शुक्रवारी राज्यात उमटले.
मुंबई : वैद्यकीय शिक्षण सचिव विजय सौरभ यांनी राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाला गुरुवारी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचे पडसाद शुक्रवारी राज्यात उमटले. बहुतांश शासकीय रुग्णालयातील २ हजार २२० डॉक्टरांनी काम बंद ठेवत आंदोलन केल्याने रुग्णसेवा विस्कळीत झाली होती. संघटनेच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही दिला.
विजय सौरभ यांनी ‘बास्टर्ड, गेट आउट, आय विल सी यू....’अशा प्रकारची भाषा वापरल्याने डॉक्टरांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. डॉक्टरांना वरिष्ठ अधिकाऱ्याकडून अशाप्रकारे अश्लाघ्य भाषेत सुनावले जात असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही, असे सांगत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही डॉक्टरांनी केली आहे.
१८व्या दिवशीही सहायक प्राध्यापकांच्या आंदोलनाची दखल नाही
n नोकरीमध्ये कायम करावे, वेतनवाढ, हक्काच्या सुट्या मिळाव्यात, अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील २२ वैद्यकीय महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापक जे. जे. रुग्णालयात साखळी उपोषणाला बसले आहेत.
n मात्र, त्यांच्याकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असून, १८ वा दिवस उलटूनही त्यांच्या उपोषणाची दखल घेतली न गेल्याने ते व्यथित झाले आहेत.
n शुक्रवारी जे. जे. रुग्णालयातील २७० सहायक प्राध्यापकांनी एका दिवसाची रजा टाकून आंदोलन केले.
n विदर्भात महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशनच्या यवतमाळ शाखेने बंद पाळत केवळ आकस्मिक सेवा दिली.
n गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरही संपावर होते. चंद्रपुरात घटनेचा निषेध नोंदवत डॉक्टरांनी सेवा दिली. अकोल येथील ‘जीएमसी’चे १३० प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांनी आंदोलनात सहभाग घेतल्याने रुग्णसेवा विस्कळीत झाली.
६७ डॉक्टर संपावर
अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील ६७ डॉक्टरांनी शुक्रवारी सामूहिक रजा आंदोलन करून महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटनेने याबाबत अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांना निवेदनही दिले. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा थांबविल्या होत्या.
प्रशासनाविरोधात घोषणाबाजी
जळगाव येथे प्राध्यापकांनी निर्दशने करीत प्रशासनाच्या अरेरावीविरोधात घोषणाबाजी केली आणि अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना निवेदनदेखील दिले. पुण्यातील ससून रुग्णालयातील सेवाही विस्कळीत झाली होती.