उद्या सकाळी 8 वाजता डॉक्टर होणार कामावर हजर
By admin | Published: March 24, 2017 02:26 PM2017-03-24T14:26:44+5:302017-03-24T16:25:10+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने संप मागे घेण्याची तयार दर्शवली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - उद्या सकाळी 8 वाजता सगळ्या डॉक्टरांनी कामावर हजर व्हावं, अन्यथा सरकारवर त्यांच्यावर कारवाई करण्यास मोकळीक असेल असा सज्जड इशारा हायकोर्टाने दिल्यावर मार्डने नमतं घेतलं आहे. हायकोर्टाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मार्ड या डॉक्टरांच्या संघटनेने डॉक्टरांना उद्या सकाळी 8 वाजता कामावर हजर राहण्याचे निर्देश देत असल्याचे सांगितले. तसेच जे डॉक्टर कामावर हजर राहणार नाहीत, त्यांच्यावर राज्य सरकार वा पालिका प्रशासन कायदेशीर कारवाई करू शकते असेही मार्डने मान्य केले आहे.
हायकोर्ट तसेच मुख्यमंत्री दोघांनीही संपकरी डॉक्टरांविरोधात ताठ भूमिका घेतल्यानंतर डॉक्टरांनी अखेर नमती भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने संप मागे घेण्याची तयारी दाखवली होती. सोबतच आपण मार्डलाही संप मागे घेण्याची विनंती करणार असल्याचं आश्वासन इंडियन मेडिकल असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने संपकरी डॉक्टरांना झापलं असून 'डॉक्टरांनी आडमुठेपणाची भुमिका सोडावी अथवा त्यांचं संरक्षण करू शकणार नाही. तसंच डॉक्टरांच्या बाबतीत निर्देश बदलावे लागतील', असं स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं .
मुंबई उच्च न्यायालयाने मार्डला 3 वाजेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला होता, त्यानंतरही प्रतिज्ञापत्र सादर न केल्यास सरकार कारवाई करण्यास मोकळं असेल असं आज सकाळी स्पष्ट केलं होतं. सरकारने कारवाई केल्यास आमची काही हरकत नसणार असल्याचं न्यायालयाने सांगितलं. तसेच संप सुरु ठेवल्यास न्यायालयाच्या अवमानाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असंही न्यायालयाने सांगितलं होतं. या सगळ्याचा परिणाम होत अखेर मार्डने सगळे डॉक्टर उद्या सकाळी 8 वाजता कामावर हजर होतील असं लिहून दिलं आहे. तसेच, जे डॉक्टर कामावर रूजू होणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली तरी त्याची जबाबदारी त्या डॉक्टरांवरच असेल, मार्डवर नसेल असंही संघटनेच्या सचिवांनी नमूद केलं आहे.
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis meets doctors's representatives again over doctor strike issue. pic.twitter.com/PeExl1CqKY
— ANI (@ANI_news) March 24, 2017
जर निवासी डॉक्टर कामावर येत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई करा असा निदर्शे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. तर दुसरीकडे डॉक्टरांच्या संपामुळे सायन रुग्णालयात 38 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या वकिलाने न्यायालयात दिली आहे. या मुद्यावर तीन वाजता होणा-या सुनावणीत चर्चा केली जाणार आहे.
Bombay HC warned MARD that if they do not file affidavit by 3 pm, HC will initiate contempt proceedings against MARD President & Secretary
— ANI (@ANI_news) March 24, 2017