...तर डॉक्टर मार खातीलच - हायकोर्ट
By admin | Published: March 24, 2017 02:22 PM2017-03-24T14:22:58+5:302017-03-24T14:36:57+5:30
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कामावर रुजू न होणा-या डॉक्टरांवर उच्च न्यायालयांवर प्रचंड संतापले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - लोकांच्या हालाला पारावार राहिला नाही तर लोकंच तुम्हाला मारतील आणि त्याची जबाबदारी तुमच्यावरच असेल अशा शब्दात उच्च न्यायालयाने संपकरी डॉक्टरांना फटकारले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कामावर रुजू न होणा-या डॉक्टरांच्या विरोधात न्यायाधीशांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. 'आम्ही कालपर्यंत तुमच्याबद्दल सहानुभूती बाळगून होतो. पण आता आमच्या मनात तुमच्याबद्दल कुठलीही सहानुभूती नाही. शब्द देऊन तुम्ही फिरवता, तुम्ही कोर्टाशी खेळत आहात. यापुढे राज्य सरकार आणि महापालिकेकडून तुमच्याकडून जी कारवाई होईल त्यासाठी तयार राहा' असे कोर्टाने डॉक्टरांना बजावले आहे.
सध्या जे सुरू आहे ते असंच सुरू राहीलं तर लोकांच्या सहनशक्तीचा अंत होईल आणि ते तुम्हाला मारतील अशी भावना यावेळी न्यायाधीशांनी व्यक्त केली आहे. मार्डच्या अध्यक्ष आणि सचिवांनी डॉक्टरांवर कारवाई करण्यास आमची काही हरकत नाही असे लिखित प्रतिज्ञापत्र द्यावे, अन्यथा तुमच्यावर कारवाई करु असे कोर्टाने बजावले आहे.
आता दुपारी तीन वाजता सुनावणी होईल. यावेळी मार्डने आपली बाजू मांडावी असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. उपचार न मिळाल्याने सायन रुग्णालयात आतापर्यंत 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सायन रुग्णालयात एकूण 635 डॉक्टर आहेत. त्यातील 89 डॉक्टर गुरुवारी डयुटीवर हजर होते. तर आज शुक्रवारी फक्त 29 डॉक्टर डयुटीवर आहेत.