डॉक्टरांचा ‘बंद’ मागे

By admin | Published: March 25, 2017 02:55 AM2017-03-25T02:55:49+5:302017-03-25T02:55:49+5:30

डॉक्टरांच्या सुरक्षेसह प्रमुख प्रलंबित मागण्यांची राज्य सरकार त्वरित अंमलबजावणी करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर

The doctor's 'closed' back | डॉक्टरांचा ‘बंद’ मागे

डॉक्टरांचा ‘बंद’ मागे

Next

मुंबई : डॉक्टरांच्या सुरक्षेसह प्रमुख प्रलंबित मागण्यांची राज्य सरकार त्वरित अंमलबजावणी करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर, खासगी डॉक्टरांच्या ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ या संघटनेने शुक्रवारी ‘कामबंद’ आंदोलन मागे घेतले. मुंबईसह राज्यातील निवासी डॉक्टरही रात्री उशीरा कामावर रूजू होण्यास सुरुवात झाली.
शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत कामावर या अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशी तंबी न्यायालयाने दिली आहे. डॉक्टरांच्या संप काळात मुंबईतील १३५ रुग्णांसह राज्यात सरकारी रुग्णालयांत ३७७ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी न्यायालयातील सुनावणीत समोर आली आहे. निवासी डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी ‘कामबंद’ आंदोलन करणाऱ्या ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठक
घेतली. संघटनेच्या प्रमुख नऊ मागण्यांची त्वरित अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे
फडणवीस यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर, इंडियन मेडिकल असोसिएशनशी संलग्न असणारे ४० हजार डॉक्टर कामावर रुजू झाल्याची माहिती ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे राज्य सचिव डॉ. पार्थिव संघवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
‘महाराष्ट्र असोसिएशन आॅफ रेसिडेन्शियल डॉक्टर्स’ने (मार्ड) संप मागे घेण्याचे आश्वासन देऊनही सध्या संप सुरूच असल्याबद्दल उच्च न्यायालयाने शुक्रवारी डॉक्टरांना फैलावर घेतले. परिस्थिती एवढीही चिघळवू नका की लोक तुम्हाला येऊन मारतील, असा संताप व्यक्त करत न्यायालयाने संपकरी डॉक्टरांना शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कामावर रुजू व्हा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशी तंबी दिली.
डॉक्टरांनी दिलेला शब्द न पाळता केवळ न्यायालयाशी खेळ केल्याने मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांचे खंडपीठ चांगलेच संतापले. डॉक्टरांची हीच वृत्ती असेल तर राज्य सरकार व संबंधित महापालिका संपकरी डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करून त्यांचे निलंबन करू शकतात, असे खंडपीठाने म्हटले आहे. ‘मार्ड’नेही संप मागे घेतल्याचे सांगत सेवेत रुजू न झालेल्या डॉक्टरांवर राज्य सरकार व संबंधित महापालिका कारवाई करू शकतात, असे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दाखल केले. उच्च न्यायालयाने परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी २७ मार्च रोजी या याचिकेवरील सुनावणी ठेवली आहे. (प्रतिनिधी)
‘ते’ मृत्यू संपामुळे नव्हे !
निवासी डॉक्टरांच्या संपामुळे मुंबई महानगरपालिकेच्या के.ई.एम. रुग्णालयात ५३, नायरमध्ये ३४ आणि सायनमध्ये ४८ असे एकूण १३५ रुग्ण दगावल्याची माहिती शुक्रवारी न्यायालयात समोर आली. मात्र ते मृत्यू संपामुळे झालेले नाहीत. संपाच्या कालावधीत नेहमीच्या सरासरीपेक्षा कमी मृत्यू झाल्याची माहिती ‘केईएम’ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. संपाच्या काळात वरिष्ठ डॉक्टरांनी रुग्णसेवा सुरू ठेवल्याचेही डॉ. सुपे यांनी सांगितले.
निवासी डॉक्टर कामावर परतण्यास सुरूवात
मुंबईत महापालिकेचे एकूण १ हजार ८६८ निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर होते. यापैकी केवळ ८७ डॉक्टर कामावर रुजू झाले होते. मात्र शुक्रवारी रात्री उशिरा नायर आणि केईएम हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी ३५, जे.जे. हॉस्पिटलमध्ये १४५ निवासी डॉक्टर कामावर हजर झाल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाने दिली.
महाअधिवक्ते रोहित देव यांनी धुळ्यातील ज्या रुग्णालयात डॉक्टरावर हल्ला झाला, तेथील एकही डॉक्टर संपावर न गेल्याची माहिती खंडपीठाला दिली. ‘या डॉक्टरांना त्यांचे कर्तव्य माहीत आहे. आम्ही त्यांचे कौतुक करतो,’ असे खंडपीठाने म्हटले.

Web Title: The doctor's 'closed' back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.