‘कॉन्स्टेबल’साठी डॉक्टर, अभियंते, वकील मैदानात, १४४९ पदांसाठी सव्वादोन लाख अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 05:57 AM2018-04-16T05:57:00+5:302018-04-16T05:57:00+5:30
राज्य सरकार एकीकडे ‘मेक इन महाराष्ट्र’ व ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’सारख्या इव्हेंटच्या माध्यमातून लाखो रोजगारांच्या निर्मितीचा गवगवा करत असले तरी सध्या मुंबई पोलीस दलात सुरू असलेल्या पोलीस भरतीच्या निमित्ताने सुशिक्षितांच्या बेरोजगारीची दाहकता उघडकीस आली आहे.
- जमीर काझी
मुंबई - राज्य सरकार एकीकडे ‘मेक इन महाराष्ट्र’ व ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’सारख्या इव्हेंटच्या माध्यमातून लाखो रोजगारांच्या निर्मितीचा गवगवा करत असले तरी सध्या मुंबई पोलीस दलात सुरू असलेल्या पोलीस भरतीच्या निमित्ताने सुशिक्षितांच्या बेरोजगारीची दाहकता उघडकीस आली आहे. अवघ्या १४४९ पदांसाठी सव्वादोन लाखांवर तरुण-तरुणी मैदानात उतरले आहेत. त्यात शेकडो अभियंते, वकील, डॉक्टरांसह ४४ हजारांवर उच्च शिक्षितांचा समावेश आहे.
कॉन्स्टेबल पदासाठी केवळ बारावी उत्तीर्णची पात्रता आवश्यक असताना विविध विद्या शाखांमधील ४१ हजार पदवीधर आणि ३ हजार पदव्युत्तर बेरोजगारीच्या वणव्यातून बाहेर पडण्यासाठी आपले नशीब अजमावत आहेत. त्यामुळे आगामी काळात मुंबईकरांच्या रक्षणासाठी वकील, डॉक्टर, इंजिनीअर, एमबीए आणि एमएड झालेले युवक-युवती हातात काठी घेऊन बंदोबस्ताला उभे असल्याचे चित्र पाहावयास मिळण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्र पोलीस दलातील विविध घटकांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून शिपाई या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यात सर्वाधिक १४४९ पदे असलेल्या मुंबई पोलीस दलातील भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया ५ एप्रिलपासून सुरू झाली. त्यासाठी यंदा रेकॉर्ड ब्रेक २ लाख २६ हजार २०५ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात तरुणींची संख्या ३२ हजार २८० एवढी आहे. सरासरी एका जागेसाठी १५६ उमेदवारांत स्पर्धा होत आहे. तर महिलांच्या ४३० जागांमध्ये एका पदासाठी ७५ जणींमध्ये स्पर्धा आहे. यातील उच्चशिक्षित उमेदवार बघून अधिकारीही अचंबित झाले आहेत.
बारावी हाच पात्रतेचा निकष
उमेदवार उच्चशिक्षित असले तरी ही भरती निर्धारित बारावी पास या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर पारदर्शी पद्धतीने घेतली जात आहे. ८ मेपर्यंत मैदानी चाचण्या पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर मेरिट निश्चित करून लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
- अर्चना त्यागी, सहआयुक्त प्रशासन व
मुंबई पोलीस भरती मंडळ अध्यक्ष
आयपीएस अधिकाऱ्यांहून उच्चशिक्षित
यंदा भरतीत उतरलेले उच्चशिक्षित उमेदवारांचे शिक्षण अनेक आयपीएस अधिकाºयांहूनही अधिक असल्याचे दिसून येत आहे. तथापि, घरच्या बिकट परिस्थितीमुळे ते नोकरीसाठी सरसावले आहेत. या उमेदवारांतून अनेक जण आयएएस व आयपीएसच्या पात्रतेचे असूनही क्लासेससाठीच्या पुरेशा आर्थिक स्थितीअभावी त्यांनी तृतीय श्रेणीतील कॉन्स्टेबल बनण्याची मानसिकता बनविली आहे.
उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या
डॉक्टर ३
बीई ३८९
एमबीए १०९
वकील १०
बी टेक ४३
एमएससी १५९
एमएसडब्ल्यू ८४
एमए १९७८
बीबीए १६७
अन्य पदवीधर ४१,१०७
पदव्युत्तर पदवीधारक २९४९
बारावी १,८२,१४७