आरोग्य विभागाच्या निषेधार्थ डॉक्टरांचा मोर्चा
By admin | Published: August 4, 2016 02:29 AM2016-08-04T02:29:42+5:302016-08-04T02:29:42+5:30
बोगस डॉक्टरांच्या नावाखाली नामांकित डॉक्टरांचा छळ होत असल्यााबद्दल वसई विरार शहरातले डॉक्टर्स संतप्त झाले आहेत.
वसई : बोगस डॉक्टरांच्या नावाखाली नामांकित डॉक्टरांचा छळ होत असल्यााबद्दल वसई विरार शहरातले डॉक्टर्स संतप्त झाले आहेत. त्यातच नालासोपाऱ्यातील एका डॉक्टरला अटक झाल्याने संतप्त झालेल्या डॉक्टरांनी वसई विरार पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकरांनी पालिकेच्या आरोग खात्याच्या कारभाराविरोधात अनेक तक्रारी आयुक्तांपुढे केल्या.
वसईत गेल्या काही दिवसांपासून बोगस डॉक्टरांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. त्यानिमित्ताने सर्व डॉक्टरांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. यामुळे नामांकित आणि मान्यताप्राप्त डॉक्टरांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्या मनात असंतोष खदखदत होता. त्यातच नालासोपाऱ्यातील एका बीएचएमएस डॉक्टरला अटक करून त्याला पोलीस कोठडीत डांबण्यात आले होते.
त्यामुळे डॉक्टरांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी मंगळवारी भर पावसात पालिकेवर मोर्चा काढला. डॉक्टरांवर गुन्हे दाखल करणे किंवा त्यांना अटक करण्याचे अधिकार पालिकेच्या आरोग्य विभागाला किंवा पोलिसांना नाहीत असे डॉक्टरांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आम्ही बोगस डॉक्टरांवरील कारवाईचे स्वागत करतो. परंतु त्या कारवाईच्या नावाखाली आमचा छळ केला जातो. सक्तीची नोंदणी क़रणे, बायोवेस्टच्या नावाखाली पैसे गोळा करणे,एमपीबीसी प्रमाणपत्रांची सक्ती करणे आदी प्रकार पालिकेच्या आरोग्य विभागाकडून केले जातात असा आरोप डॉ. आशा मुंडे यावेळी केला.
आम्हाला गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. याप्रकरणी सात दिवसात चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्त सतीश लोखंडे यांनी यावेळी मोर्चेकरांना दिले.