अनिष्ट रूढीविरोधात डॉक्टरांचा पुढाकार!
By admin | Published: August 21, 2016 03:45 PM2016-08-21T15:45:49+5:302016-08-21T15:45:49+5:30
ग्रामीण भागात वाढत असलेल्या अनिष्ट रूढींना फाटा देण्यासाठी, लाखनवाडा येथील एका डॉक्टरांनी स्वत: पुढाकार घेतला आहे.
ऑनलाइन लोकमत
खामगाव, दि. २१ : ग्रामीण भागात वाढत असलेल्या अनिष्ट रूढींना फाटा देण्यासाठी, लाखनवाडा येथील एका डॉक्टरांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. स्वत:च्या आई आणि भावाच्या अंत्ययात्रेत टिटव्या ( समोर धरल्या जाणाऱ्या मडक्या) ऐवजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या फोटोतून समाजजागृतीचा प्रयत्न चालविला आहे.
अंत्ययात्रेत परंपरेनुसार अवास्तव महत्व असणाऱ्या टिटव्या ऐवजी अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो धरुन समाजाला महापुरुषांच्या विचारांचा संदेश लाखनवाडा येथील डॉक्टर संतोष हटकर देत आहेत. ८ जून रोजीत्यांच्या आई साखराबाई विठोबा हटकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यावेळी पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते असलेल्या डॉक्टर संतोष हटकर यांनी पहिल्यांदा आईच्या अंत्ययात्रेत टिटवे टाळले होते. हा वैचारिक वारसा पुढे जावा म्हणून प्रयत्नशील असलेल्या संतोष हटकर यांनी शनिवारी त्यांचे भाऊ गंगाराम विठोबा हटकर (५३)यांचे निधन झाले.
आपल्या भावाच्याही अंत्ययात्रेत टिटवे न वापरता अहील्यादेवींचा फोटो घेतला. महापुरुषांचा सुधारणावादी विचार आपल्या समाजामध्ये पोहचावा म्हणून हे सुधारणावादी पाऊल उचलत, याचा प्रचार, प्रसार करण्याचा आपला संकल्प असल्याचे डॉ.हटकर यांनी सांगितले.
पिंडदानाऐवजी रक्तदान!
आईच्या मृत्यूनंतर पिंडदानाऐवजी रक्तदानाचा पायंडाही डॉ. संतोष हटकर यांनी पाडला आहे. ८ जून रोजी आई मृत्यूमुखी पडल्यानंतर १९ जून रोजी हटकर यांनी आईचे पिंडदान करण्याऐवजी लाखनवाडा येथे रक्तदान केले होते. या शिबिरात १७ जणांनी रक्तदान केले. महापुरूषांचा वैचारिक वारसा पुढे नेण्यासाठी कृतीशील गोष्टी करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे.