‘खाकी वर्दी’साठी डॉक्टर, वकील, इंजिनियर रांगेत
By admin | Published: March 11, 2016 04:22 AM2016-03-11T04:22:44+5:302016-03-11T04:22:44+5:30
पोलीस कॉन्स्टेबल भरती प्रक्रियेतून राज्यातील बेरोजगारीचे विदारक चित्र समोर आले आहे. जवळपास साडेचार हजार जागांसाठी तब्बल साडेसात लाख अर्ज प्राप्त झाले असून केवळ बारावी पास असण्याची
जमीर काझी, मुंबई
पोलीस कॉन्स्टेबल भरती प्रक्रियेतून राज्यातील बेरोजगारीचे विदारक चित्र समोर आले आहे. जवळपास साडेचार हजार जागांसाठी तब्बल साडेसात लाख अर्ज प्राप्त झाले असून केवळ बारावी पास असण्याची शैक्षणिक अट असताना देखील डॉक्टर, अभियंते, वकील यांच्यासह अन्य पदवीधारकांनीही अर्ज केले आहेत.
सुमारे साडेतीन वर्षांच्या कालावधीनंतर राज्यात पोलीस कॉन्स्टेबलची भरती होत आहे. पोलीस दलातील विविध ६१ घटकांमध्ये एकूण ४ हजार ८३३ कॉन्स्टेबलची पदे भरावयाची आहेत. त्यासाठी ७ लाख ५८ हजार ७२२ अर्ज आले आहेत. यातील ३० टक्के पदे महिलांसाठी राखीव असून यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या १ लाख ७३०० इतकी आहे. राज्यात सर्वाधिक १ लाख ४४ हजार अर्ज मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत आलेले आहेत.
गृह विभागाने इच्छुक उमेदवारांची वयोमर्यादा तीन वर्षांनी वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही मर्यादा सर्वसाधारण प्रवर्गासाठी २५ वरुन २८ वर्षे तर विशेष मागास प्रवर्गात ३० वरून ३३ वर्षे झाली. त्यामुळे केवळ बारावीच नव्हे तर पदवीधर, द्विपदवीधर, बी.एड, एम.एड., डॉक्टर, वकील, इंजिनियर यांनी देखील अर्ज केले. शैक्षणिक पात्रतेपेक्षा आर्थिक स्थैर्याचा विचार करीत ३ डॉक्टर, ३८ वकील व १०६८ अभियंतासह अनेक उच्चशिक्षित युवक आणि युवती अंगावर ‘खाकी’ चढविण्यास तयार झाले आहेत.