डॉक्टर दाम्पत्य किडनी रॅकेटचे म्होरके
By admin | Published: December 4, 2015 12:53 AM2015-12-04T00:53:17+5:302015-12-04T00:53:17+5:30
किडनी तस्करीच्या रॅकेटमधील दलालांचे म्होरके यवतमाळ येथील डॉक्टर श्रोत्री दाम्पत्य असल्याची माहिती गुरुवारी उजेडात आली. त्यांच्या शोधासाठी गुरुवारी अकोला
- सचिन राऊत, अकोला
किडनी तस्करीच्या रॅकेटमधील दलालांचे म्होरके यवतमाळ येथील डॉक्टर श्रोत्री दाम्पत्य असल्याची माहिती गुरुवारी उजेडात आली. त्यांच्या शोधासाठी गुरुवारी अकोला पोलिसांची दोन पथके रवाना झाली. डॉ. मंगला व सुहास श्रोत्री यांनी यवतमाळमधील हॉस्पिटल बंद करून नागपुरातून हा धंदा सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
शिवाजीनगर येथील आनंद भगवान जाधव (३०) याने संतोष शंकर गवळी याला व्याजाने २० हजार रुपये दिले होते. रक्कम थकल्याने आनंदने गवळीला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन किडनी काढण्यास तयार केले. त्यानंतर या रॅकेटमधील देवेंद्र शिरसाट याने गवळीचा लागलीच पासपोर्ट काढून, त्याची सांगली जिल्ह्याच्या इस्लामपूर येथील रहिवासी शिवाजी कोळी याच्याशी भेट घालून दिली. कोळी याने गवळीला श्रोत्री दाम्पत्याकडे नेले.
त्यांनी गवळीची आधी यवतमाळमधील एका हॉस्पिटलमध्ये तपासणी केली. त्यानंतर त्यांनी नागपुरातील एका डॉक्टरच्या मदतीने संतोष गवळी याच्या नागपूरमध्ये पुन्हा तपासण्या केल्या. श्रोत्री दाम्पत्य गवळीला घेऊन श्रीलंकेत गेले. तिथे कोलंबो शहरात १० दिवस मुक्काम केल्यानंतर त्याची किडनी काढण्यात आली. त्यासाठी गवळीला ४ लाख रुपये देण्याचे ठरले होते. प्रत्यक्षात त्याच्या हाती केवळ ३ लाख रुपये देण्यात आले.
‘लोकमत’ने या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर, पोलिसांनी बुधवारी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. शिरसाट व जाधव या दोघांना पोलिसांनी अटकही केली. त्यांच्या चौकशीत आणखी धागेदोरे लागल्यावर अन्य दोघांना ताब्यात घेण्यात आले. या संशयितांकडून मिळालेल्या माहितीवरून, अकोला व सांगलीतील दलालांचा म्होरक्या हा यवतमाळ येथील डॉक्टर श्रोत्री दाम्पत्य असल्याचे उघड झाले आहे. आणखी नागरिकांची किडनी काढून तस्करी करण्यात आल्याचे आता समोर येत आहे. गुरुवारी पीडित साक्षीदारांनी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली.
दोन्ही संतोषची होणार वैद्यकीय तपासणी
पीडित संतोष कोल्हटकर व संतोष गवळी या दोघांची स्थानिक गुन्हे शाखा लवकरच वैद्यकीय तपासणी करणार आहे. त्यानंतर या प्रकरणातील आरोपींवर मानवी अवयव तस्करीप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
यांच्या काढल्या किडनी
श्रोत्री दाम्पत्याने ५ जणांच्या किडनीचा व्यवहार केल्याचे समोर आले आहे. त्यात संतोष गवळी, संतोष कोल्हटकर, शांताबाई खरात, देवा कोमलकर व अमर नामक युवकाचा समावेश आहे. शांताबाईला
४ लाखांपैकी २ लाख रुपये देण्यात आले असून, संतोष गवळी व कोल्हटकर यांना ४पैकी ३ लाख रुपये देण्यात आले. देवा व अमर यांना किती रुपये देण्यात आले, हे समजू शकले नाही.
तिघांची नावे दिली होती ‘लोकमत’ने
शांताबाई, देवा आणि अमर या तीन पीडितांची नावे सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने त्यांचा शोध घेऊन, या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
यवतमाळमधील हॉस्पिटल
३ वर्षांपूर्वी बंद
डॉ. मंगला व डॉ. सुहास श्रोत्री यांचे यवतमाळ येथील टिळकवाडीमध्ये श्रोत्री हॉस्पिटल होते; मात्र ३ वर्षांपूर्वी हॉस्पिटल बंद करून, ते नागपूर येथील मोठ्या जावयाकडे वास्तव्यास गेले. येथून त्यांनी किडनी तस्करीचे रॅकेटच चालविल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यामध्ये नागपूर येथील एका डॉक्टरचाही समावेश असल्याचे समजते.
महत्त्वाचे दस्तऐवज पोलिसांच्या हाती आले आहेत. यामध्ये काही डॉक्टरांचा लवकरच पर्दाफाश करण्यात येणार आहे. रॅकेटच्या म्होरक्यासह काही बड्या हस्तींना बेड्या ठोकण्यात येतील. - चंद्रकिशोर मीणा, पोलीस अधीक्षक, अकोला