मिरजेत ट्रकने ठोकरल्याने डॉक्टर दाम्पत्य ठार
By admin | Published: May 25, 2017 07:50 PM2017-05-25T19:50:29+5:302017-05-25T19:50:29+5:30
भरधाव ट्रकने मोटारीला ठोकरल्याने डॉ. शिवाजी विश्वनाथ वडजकर (वय ५१) व सौ. कांचन शिवाजी वडजकर (४६, रा. कर्मवीर चौक, मिरज) या दाम्पत्याचा मृत्यू झाला
ऑनलाइन लोकमत
मिरज (सांगली), दि. 25 - मिरज-पंढरपूर रस्त्यावर भरधाव ट्रकने मोटारीला ठोकरल्याने डॉ. शिवाजी विश्वनाथ वडजकर (वय ५१) व सौ. कांचन शिवाजी वडजकर (४६, रा. कर्मवीर चौक, मिरज) या दाम्पत्याचा मृत्यू झाला. अपघातप्रकरणी ट्रक चालकास पोलिसांनी अटक केली आहे.
पशुवैद्यकतज्ज्ञ असलेले डॉ. शिवाजी वडजकर गुरुवारी दुपारी मोटारीतून (क्र. एमएच १० एजी ३३८४) विट्याला गेले होते. विट्यातून मिरजेकडे परत येत असताना मिरजेत बालाजी कार्यालयासमोर ते आले असता, भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने (क्र. एमपी ०९ एचएच ५११८) त्यांच्या मोटारीला जोरदार धडक दिली. या अपघातात कांचन वडजकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या डॉ. शिवाजी वडजकर यांना तातडीने मिरज शासकीय रूग्णालयात नेण्यात आले, पण त्यांचाही तेथे उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
अपघातस्थळी मोठी गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ट्रकच्या धडकेने मोटारीच्या पुढील भागाचा चक्काचूर होऊन मोटारीत रक्ताचे थाररोळे पसरले होते. पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन डॉ. वडजकर दाम्पत्यास शासकीय रूग्णालयात हलविले.
त्यांच्या अपघाती मृत्यूचे वृत्त समजताच मिरज परिसरातील पोल्ट्री व्यावसायिकांनी शासकीय रूग्णालयात धाव घेतली. हा ट्रक कोल्हापूरहून आटपाडीकडे जात असताना ट्रकने वडजकर यांच्या मोटारीला ठोकरले. अपघातप्रकरणी ट्रकचालक हलकुराम शेन (४५, रा. शिवपुरी, मध्य प्रदेश) यास पोलिसांनी अटक करून त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
पशुवैद्यक तज्ज्ञ
मूळचे नांदेड येथील डॉ. शिवाजी वडजकर पोल्ट्री व्यवसायातील पशुवैद्यक तज्ज्ञ म्हणून मिरजेत काम करीत होते. डॉ. वडजकर यांनी काही काळ विटा येथे व नंतर मिरजेत बाळकृष्ण ग्रुपमध्ये पशुवैद्यक तज्ज्ञ म्हणून काम केले होते. पोल्ट्री व्यवसाय सल्लागार म्हणून काम करणारे डॉ. वडजकर ह्यपोल्ट्री न्यूजह्ण या नियतकालिकाचे संपादक होते. त्यांचा मुलगा बारावीत, तर मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावी नांदेड येथे परत जाण्याची डॉ. वडजकर यांची इच्छा होती. पण गुरुवारी या दाम्पत्याचा मृत्यू झाला.