डॉक्टरांची सुरक्षा वाढणार
By admin | Published: May 24, 2017 03:05 AM2017-05-24T03:05:36+5:302017-05-24T03:05:36+5:30
रुग्णाच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांना होणारी मारहाण रोखण्यासाठी अखेर महापालिका रुग्णालयांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रुग्णाच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांना होणारी मारहाण रोखण्यासाठी अखेर महापालिका रुग्णालयांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार केईएम, लोकमान्य टिळक, नायर व कूपर या रुग्णालयांत लवकरच आणखी ३२१ खासगी सुरक्षारक्षक तैनात ठेवणार आहेत.
मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये राज्यातूनच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येत असतात. त्यामुळे पालिका रुग्णालय व डॉक्टरांवरही कामाचा ताण वाढतो आहे. डॉक्टर व परिचारिकांची कुमक रुग्णांच्या गर्दीपुढे तोकडी पडत आहे. परिणामी, रुग्णांकडे दुर्लक्ष झाल्यास रुग्णांचे नातेवाईक व कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची होण्याचे प्रसंग घडतात.
मारहाणीच्या अशा काही घटना, डॉक्टरांचे आंदोलन, रुग्णांचे हाल पाहून अखेर पालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्यानुसार सध्या सुरक्षेत असलेल्या ४०० सुरक्षारक्षकांबरोबरच १ मेनंतर आणखी ३२१ खासगी सुरक्षारक्षक तैनात केले जाणार आहेत. त्यासाठी पालिका या खासगी सुरक्षारक्षकांवर ११ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर प्रशासनाने मांडला आहे.
मार्चमध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर केईएममध्ये ११२, लोकमान्य टिळक रुग्णालयांत १०४, नायर रुग्णालयांत ७६ व आर. एन. कूपर रुग्णालयांत २९ खासगी सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. यात आणखी ३२१ सुरक्षारक्षकांची वाढ केली जाणार आहे. यापूर्वी नियुक्त केलेले चारशे व आता ३२१ असे एकूण ७२१ सुरक्षारक्षक तैनात होणार आहेत.
लवकरच केईएम रुग्णालयात ११२ रक्षकांची आणखी नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी चार कोटी नऊ लाख, शीव रुग्णालयातील १०४ रक्षकांसाठी तीन कोटी ८७ लाख, नायर रुग्णालयातील ७६ रक्षकांसाठी दोन कोटी ६४ लाख तर कूपर रुग्णालयातील २९ रक्षकांसाठी ८० लाख अशा एकूण ३२१ सुरक्षारक्षकांसाठी वर्षाला ११ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.