डॉक्टरांच्या स्टेथोस्कोपने पित्याने केली मृत चिमुकल्याची तपासणी
By Admin | Published: April 21, 2017 08:47 PM2017-04-21T20:47:45+5:302017-04-21T20:47:45+5:30
काही मिनिटांपूर्वीच आपल्याकडे नजरभरून पाहणारा चिमुकला आपल्याला असा सोडून जाऊ शकत नाही. काही तरी चुकते असे म्हणत पित्याने
संतोष हिरेमठ/ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 21 - घाटी रुग्णालयात चार दिवसांपासून उपचार घेणाऱ्या चिमुकल्याने जगाचा निरोप घेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले; परंतु काही मिनिटांपूर्वीच आपल्याकडे नजरभरून पाहणारा चिमुकला आपल्याला असा सोडून जाऊ शकत नाही. काही तरी चुकते असे म्हणत पित्याने सरळ डॉक्टरांचा स्टेथोस्कोप घेतला आणि मुलाच्या हृदयाची धडधड ऐकण्याचा प्रयत्न केला. मुलाने ईहलोकाचा निरोप घेतल्याचे लक्षात आल्याने पित्यावर आणि संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला.
घाटी रुग्णालयात गुरुवारी मन हेलावणारा प्रसंग पाहून अनेकांचे डोळे भरून आले. वढव (ता. लोणार, जि. बुलडाणा) येथील रामप्रसाद थोरात (शास्त्री) यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा रोहितला रविवारी घाटीत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पाच रुपयांत मिळणारे थंडपेय पिण्यात आल्यानंतर रोहितची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळे त्यास प्रारंभी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु या ठिकाणी उपचाराच्या सुविधा नसल्याच्या कारणाने त्यास घाटीत दाखल करण्यात आले. त्याच्यावर ट्रॉमामध्ये उपचार सुरू होते.
व्हेटिंलेटरवर असलेला रोहित आज सकाळी सगळ्यांकडे बघत होता. आवाजाला प्रतिसाद देत होता. आनंदाच्या भरात रामप्रसाद थोरात यांनी मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरणही केले; परंतु दुपारी अचानक रोहितचा मृत्यू झाल्याचे डॉक्टररांनी सांगितले. त्यामुळे कुटुंबियांना धक्काच बसला, असे होऊ शकत नाही, असे म्हणत रामप्रसाद थोरात यांनी सरळ डॉक्टरांच्या गळ्यातील स्टेथोस्कोप घेतला आणि रोहितच्या छातीला लावला. तेव्हा मात्र त्यांना त्याच्या मृत्यूचे सत्य पचवावे लागले.
एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. डॉक्टरांनी मुलाच्या उपचाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही थोरात यांनी केला. रोहित दाखल झाला तेव्हाच प्रकृती गंभीर होती. त्याविषयी कल्पना देण्यात आली होती,असे डॉक्टरांनी सांगितले. हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्यासंदर्भात कोणीही तक्रार दिली नसल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी यांनी सांगितले.
उपचाराकडे दुर्लक्ष
काही वेळापूर्वी माझ्याकडे पाहणाऱ्या मुलाचा मृत्यू झाल्याचा विश्वास बसला नाही. त्यामुळे स्वत: स्टेथोस्कोपने तपासले. मुलाच्या उपचाराकडे दुर्लक्ष झाले. उपचाराकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी डॉक्टरांना सूचना केली; परंतु तरीही डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचे रामप्रसाद थोरात म्हणाले.