जम्मू-काश्मीरमध्ये पाठविणार डॉक्टरांची चमू
By admin | Published: September 14, 2014 01:05 AM2014-09-14T01:05:39+5:302014-09-14T01:05:39+5:30
पृथ्वीवरील स्वर्ग समजल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये सध्या पुराने थैमान घातले आहे. गेल्या ६० वर्षांतला सर्वात भयानक असा पूर जम्मू-काश्मीरमध्ये आलाय. या पुराने १७५ पेक्षा जास्त बळी घेतलेत.
आयएमएचा पुढाकार : औषधे आणि निधीही देणार
नागपूर : पृथ्वीवरील स्वर्ग समजल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये सध्या पुराने थैमान घातले आहे. गेल्या ६० वर्षांतला सर्वात भयानक असा पूर जम्मू-काश्मीरमध्ये आलाय. या पुराने १७५ पेक्षा जास्त बळी घेतलेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतर आता रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. जम्मूसह अन्य भागांत तात्पुरती रु ग्णालये उभारण्यात येत आहेत, यात इंडियन मेडिकल असोसिएशननेही (आयएमए) मदतीचा हात पुढे केला आहे. साथीच्या आजारावर आवश्यक औषधांसोबतच, डॉक्टरांची चमू आणि आर्थिक मदतीही केली जाणार आहे.
काश्मिरातील पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. नेहमीप्रमाणे संकटकाळी धावून येणाऱ्या आयाएमएनेही यात तत्परता दाखविली आहे. आयएमए नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, आयएमएच्या दिल्ली येथील मुख्यालयाने आपल्या सर्व शाखांना जम्मू-काश्मीरमध्ये मदतकार्य करण्याचे आवाहन केले आहे. यात साथरोगांवरील औषधे, अॅण्टीबायटीक, ताप, खोकला यावरील औषधे गोळा करून संबंधित शाखेकडे जमा करण्याचा सूचना केल्या आहेत.
सोबतच या राज्यात आपली सेवा देण्यासाठी इच्छुक असलेल्या डॉक्टरांची नावे पाठविण्याची व ‘आयएमए आपत्ती व्यवस्थापन फंड’ मध्ये मदत करण्याचे आवाहनही केले आहे. त्यानुसार नागपूर शाखा कामाला लागली आहे. शहरात आयएमएचे तीन हजार सदस्य आहेत. या सर्वांना शनिवारी एसएमएस पाठविण्यात आले आहेत.
सोमवारपर्यंत सेवा देणाऱ्या डॉक्टरांची यादी व औषधे मुख्य कार्यालयात पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार वेगाने कामे सुरू झाली आहेत, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)