डॉक्टर महिलेने केला पतीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2015 04:24 AM2015-12-01T04:24:30+5:302015-12-01T04:24:30+5:30
रागाच्या भरात बेभान झालेल्या महिलेने नवऱ्याच्या छातीवर बसून चाकूचे वार करून हत्या केली. रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत
नागपूर : रागाच्या भरात बेभान झालेल्या महिलेने नवऱ्याच्या छातीवर बसून चाकूचे वार करून हत्या केली. रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली. विशेष म्हणजे, आरोपी पत्नी पेशाने दंत चिकित्सक आहे.
टिष्ट्वंकल रविकांत उके (४०) असे तिचे नाव असून, पोलिसांनी तिला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. श्रीरामनगर येथे सिंचन विभागाचे निवृत्त अभियंता मधुकर रामचंद्र उके यांचे दुमजली निवासस्थान आहे. तळमजल्यावर मधुकर आणि त्यांची पत्नी मृदुलता (६७) राहतात. तर, पहिल्या मजल्यावर मुलगा रविकांतचा परिवार राहात होता. रविकांत आणि टिष्ट्वंकलला रुजल नामक ८ वर्षांचा मुलगा आहे.
रविकांत पोलिओग्रस्त होता. तो पॅथॉलॉजी चालवायचा. तेथेच टिष्ट्वंकलचे छोटेसे दंत क्लिनिक होते. ती शीघ्रकोपी स्वभावाची होती. स्वत: कमवत असल्यामुळे पतीची कोणतीही गोष्ट ऐकून घेत नसे. सारखी चिडचिड करायची. तिच्या अशा वागण्यामुळे रविकांत तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यातून दोघांमध्ये नेहमीच खटके उडायचे.
रविवारी टिष्ट्वंकलचे वडील तेथे आले होते. रात्री सासऱ्याशी बोलताना रविकांतने टिष्ट्वंकल नीट वागत नसल्याची तक्रार केली. त्यावरून त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. शब्दाने शब्द वाढले. या वेळी रवी पलंगावर झोपला होता. टिष्ट्वंकलने घरातील चाकू हातात घेतला आणि रविकांतच्या छातीवर बसून त्याच्या वर्मी घाव घातले. छाती-पोटावर एकापाठोपाठ अनेक घाव घातल्याने रविकांतने किंकाळी फोडली. ती ऐकून त्याचे आईवडील वर धावले.
रविकांत रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. तर, टिष्ट्वंकलच्या हातात चाकू होता. मृदुलता यांनी तिच्याकडे धाव घेत चाकू पकडला. त्यामुळे त्यांच्याही हाताला जखम झाली. यानंतर टिष्ट्वंकल पळून गेली. मधुकर उके यांनी रविकांतला तातडीने डॉक्टरकडे नेले. मात्र, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी टिष्ट्वंकलविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. तसेच टिष्ट्वंकलवर दबाव वाढवण्यासाठी पोलिसांनी तिच्या वडिलांकडून तिला फोन करवून घेतला. ती कुठे आहे, ते सांगत नव्हती. ‘तुझ्यामुळे पोलीस मला अटक करतील,’ असे वडिलांनी तिला सांगितले. दोष नसताना रविकांतच्या हत्येच्या आरोपात पोलीस आपल्या वडिलांना अटक करू शकतात, ही भीती वाटल्यामुळे टिष्ट्वंकलने पोलिसांना आपले लोकेशन कळविले. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.