दोडामार्गमध्ये ‘वुई वॉण्ट गोवा’च्या घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 12:31 AM2019-11-04T00:31:05+5:302019-11-04T00:34:20+5:30

विलिनीकरणासंबंधी बैठक : शिवसेना कार्यकर्त्यांनी आणला व्यत्यय; जोरदार खडाजंगी

Dodamarg youth says 'We Want Goa' | दोडामार्गमध्ये ‘वुई वॉण्ट गोवा’च्या घोषणा

गोव्यात विलिनीकरणासंबंधी चर्चा करण्यासाठी दोडामार्ग येथे जमलेले युवक.

Next

सचिन खुटवळकर/दोडामार्ग : गोव्यालगत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्याच्या गोव्यात विलिनीकरणासंबंधी चर्चा करण्यासाठी आयोजित पहिल्या बैठकीत शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत गोंधळ घातला. मात्र, युवकांनी ‘वुई वॉण्ट गोवा’ अशा घोषणा देत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. दरम्यान, बैठकीचे संयोजक व शिवसेना पदाधिका-यांमधील वाद धक्काबुक्कीपर्यंत पोहोचल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला.
तालुका निर्मितीनंतर २0 वर्षांत अपेक्षित विकास न झाल्याने व सर्वच गोष्टींत गोव्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने काही युवकांनी ‘दोडामार्ग तालुक्याचे गोव्यात विलिनीकरण’ ही चळवळ सुरू केली आहे. या चळवळीच्या वाटचालीची दिशा ठरविण्यासाठी दोडामार्ग येथील गणेश मंदिरात रविवारी (दि.३) सकाळी १0 वाजता बैठक आयोजित केली होती. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सुमारे दोनशे तरुणांनी या बैठकीला उपस्थिती लावली. बैठकीच्या संयोजकांपैकी वैभव इनामदार यांनी प्रास्ताविक केले व उपस्थित ग्रामस्थ, तरुण व महिलांना भूमिका मांडण्याची विनंती केली. या दरम्यान त्या ठिकाणी काही शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते आले. एका ग्रामस्थाने बोलण्याच्या ओघात स्थानिक शिवसेना आमदारावर टीका केली. त्याचवेळी हस्तक्षेप करत शिवसेना तालुका प्रमुख बाबूराव धुरी यांनी त्याला रोखले व येथेच ठिणगी पडली. विलिनीकरणाला कडाडून विरोध करतानाच धुरी यांनी बैठक आयोजित करणा-यांना खडे बोल सुनावल्याने संतप्त तरुणांनी त्यांना ठप्प झालेल्या विकासकामांविषयी जाब विचारला.
दरम्यान, आणखी शिवसेना कार्यकर्ते त्या ठिकाणी आले. विलिनीकरणवादी व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. दोन्ही बाजूच्या काही लोकांनी मध्यस्थी केली. मात्र, पुन्हा पुन्हा वादंग झाले. अखेरीस याचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. याची माहिती मिळाल्यानंतर दोडामार्ग पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी येऊन दोन्ही गटांना तेथून निघून जाण्याची सूचना केली. त्यामुळे आयोजकांनी पुन्हा नव्याने बैठक बोलविण्यात येईल, असे जाहीर करत बैठक आटोपती घेतली.
दरम्यान, शिवसेनेचे धुरी यांनी सामंजस्याची भूमिका घेत आपण विकासाचे सर्व मुद्दे व लोकांच्या मागण्या घेऊन पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर व खासदार विनायक राऊत यांच्यासोबत बैठक निश्चित करू, असे आश्वासन दिले.
चर्चेसाठी सकाळी १0 वाजता दोडामार्ग येथील गणेश मंदिरात तरुण जमा होऊ लागले. साडेदहा वाजेपर्यंत पन्नासेक तरुण जमले व बैठकीला प्रारंभ झाला. एकेकजण आपली बाजू मांडू लागला. राजकीय नेत्यांकडून दोडामार्गवर कसा अन्याय झाला, याची जंत्री सुटू लागली...
यादरम्यान सुमारे दोनशे युवक, महिला व ग्रामस्थ जमले. शिवसेना पक्षाचे काही पदाधिकारी कार्यकर्ते तसेच काही भाजप कार्यकर्तेही जमा झाले. गोव्यात स्थायिक झालेल्या एका गृहस्थांनी बोलण्याच्या ओघात स्थानिक शिवसेना आमदारावर टिप्पणी करताच शिवसेनेचे कार्यकर्ते बिथरले. याचा जाब आयोजकांना विचारतानाच शिवसेना तालुकाध्यक्ष बाबूराव धुरी यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यालाच हरकत घेतली. तसेच आमदारांनी केलेल्या विकासकामांचीही माहिती दिली. मात्र, संतप्त युवकांनी ‘इतका विकास झाला, तर अजून इथले तरुण गोव्यात कामाला का जातात? आरोग्याच्या सुविधांसाठी गोव्यात का जावे लागते? उच्च शिक्षणाची सोय का झाली नाही?’ अशा प्रश्नांचा भडिमार केला. याच गदारोळात ‘वुई वॉण्ट गोवा’ ‘वुई वॉण्ट गोवा’ अशा घोषणा युवकांनी दिल्या. या अनपेक्षित प्रतिहल्ल्याने काही क्षण निरुत्तर झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी ‘आमच्या नेत्यांविरोधात तुम्ही बोललातच का?’ या मुद्द्यावरून वाद घालायला सुरुवात केली. या वादात, आॅगस्ट महिन्यात तिळारी नदीला आलेल्या पुरामुळे झालेली हानी, पावसामुळे शेती-बागायतींचे झालेले नुकसान, रस्ते-वीज-पाणी आदी पायाभूत सुविधांकडे होणारे दुर्लक्ष आदी मुद्दे आले व मूळ विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून चर्चा भरकटली.
या वादाला हल्लीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमीही होती. गोव्याच्या मंत्र्यांनी प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, असे विचारत शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले. मात्र, हा राजकीय मुद्दा असल्याने आयोजकांनी वाद टाळण्यासाठी, तुमच्या नेत्यांनी केलेल्या विकासाच्या मुद्द्यांवर बोला, असा आग्रह धरला. या दरम्यान, दोन्ही बाजूचे लोक एकत्र येऊन व उभे राहून मोठ्याने बोलू लागल्याने ढकलाढकली सुरू झाली. यातच वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप झाल्याने काहींनी धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. परिणामी धक्काबुक्कीबरोबरच शिवीगाळ करण्यापर्यंत विषय तापला. या गडबडीत मारामारी होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला व दोन्ही गटांना तेथून निघून जाण्याची सूचना केली.
या वेळी बैठकीत रामचंद्र ठाकूर, भूषण पांगम, वैभव इनामदार आदींनी विलिनीकरणाच्या आग्रहाबाबत भूमिका मांडली. शिवसेनेतर्फे बाबूराव धुरी यांनी विलिनीकरणाला विरोध केला. त्यांना संजय गवस, नितीन मोर्ये आदी कार्यकर्त्यांचे पाठबळ मिळाले.

गोव्यात विलिनीकरण हा समस्येवरचा तोडगा असू शकत नाही. तालुक्यातील युवक गोव्यात नोकरीसाठी जातात, हे आम्हालाही मान्य आहे. आरोग्याच्या सुविधांचा प्रश्न गोवा सरकारच्या आडमुठेपणामुळे निर्माण झाला आहे. याआधीही सगळेच रुग्ण गोव्याला जायचे. पण तेथे मोफत उपचार बंद केल्यामुळे ही समस्या अधिक उग्र बनली. याविषयावर आमदार, खासदारांचे लक्ष वेधणार.
- बाबूराव धुरी, शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख

शैक्षणिक सुविधांच्या बाबतीत गोवा खूप पुढारलेला आहे. दोडामार्गमध्ये अशा कोणत्याही सुविधा नाहीत. अन्य पायाभूत सेवांचा बोजवारा उडाला आहे. रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत स्थानिक नेतृत्व गंभीर नाही. तालुक्याचा विकासच होणार नसेल, तर गोव्यात विलिनीकरण करा, अशी मागणी करण्यात काय गैर आहे?
- भूषण पांगम, रामचंद्र ठाकूर, विलिनीकरणाचे समर्थक

गोव्यातील पत्रकारांना धक्काबुक्की!
बैठक संपल्यानंतर गोव्यातील स्थानिक वाहिनीचा प्रतिनिधी व अन्य एक टीव्ही पत्रकार विलिनीकरणवादी गटाच्या प्रतिनिधीची प्रतिक्रिया घेत होता. त्यावेळी ‘हे गोव्यातील पत्रकार इथे कशाला? तुम्ही गोव्यात निघून जा,’ असे म्हणत शिवसेना कार्यकर्ते बाबूराव धुरी यांनी धक्काबुक्की करत कॅमेरा बंद करण्यास भाग पाडले. या वेळी स्थानिक पत्रकारांनी धुरी यांची समजूत काढली.

तीन तास चालली बैठक
सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेली बैठक तब्बल तीन तास चालली. यातील पहिला अर्धा तास वगळता इतर वेळेत आरोप-प्रत्यारोप करणारी भाषणे झाली. ज्या उद्देशाने बैठकीचे आयोजन केले होते, तो उद्देश बाजूला पडल्याचे दिसून आले. पक्षविरहित बैठकीत विविध पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाल्यामुळे गोंधळ झाला. अखेरीस दीड वाजण्याच्या सुमारास बैठक आटोपती घेण्यात आली.

पुन्हा घेणार व्यापक बैठक
पहिल्याच बैठकीत राजकीय मुद्दे उकरून काढून शिवसेना कार्यकर्त्यांनी खोडा घातल्याने मुख्य मुद्दे बाजूला पडले. मात्र, विलिनीकरण व तालुक्याचा विकास या मुद्द्यांवर पुन्हा व्यापक स्वरूपाची बैठक घेण्यात येईल, असे वैभव इनामदार यांनी जाहीर केले. उपस्थित युवकांनी त्यांना जोरदार समर्थन देत पुढील दिशा ठरविण्याबाबत पाठिंबा दिला.

Web Title: Dodamarg youth says 'We Want Goa'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.