दरोडेखोर ‘चेकमेट’!
By admin | Published: July 2, 2016 05:24 AM2016-07-02T05:24:36+5:302016-07-02T05:24:36+5:30
वागळे इस्टेट येथील चेकमेट सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीवर पडलेल्या दरोड्याचा उलगडा अवघ्या दोन दिवसांत करण्यात ठाणे शहर पोलिसांना यश आले.
ठाणे : वागळे इस्टेट येथील चेकमेट सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीवर पडलेल्या दरोड्याचा उलगडा अवघ्या दोन दिवसांत करण्यात ठाणे शहर पोलिसांना यश आले. या दरोड्यातील १६ जणांपैकी सहा जणांना जेरबंद करण्यात आले असून, त्यात कंपनीतील आजी-माजी कर्मचारीही आहेत. त्यांच्याकडील नऊ कोटींपैकी सव्वाचार कोटी रुपये आणि तीन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. नीतेश भगवान आव्हाड उर्फ गोलू (२२), मयूर राजेंद्र कदम उर्फ अजिंक्य (२१), अमोल अरुण कर्ले (२६), आकाश चंद्रकांत चव्हाण उर्फ चिंग्या (चौघेही ठाण्याचे) आणि उमेश सुरेश वाघ (२८) तसेच हरिश्चंद्र उत्तम मते (३०) (दोघे नाशिकचे) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. अन्य आरोपी नाशिकच्या वाडीवऱ्हे, घोटी, सातपूर भागातील आहेत. त्यांना पकडण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागांत आणि परराज्यांतही पथके रवाना करण्यात आली असून, त्यांना लवकरच गजाआड केले जाईल, असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला.
वागळे इस्टेट येथील हिरादीप बिल्डिंगच्या तळघरात असलेल्या चेकमेट कंपनीत २८ जूनला मध्यरात्री सव्वातीनच्या सुमारास हा दरोडा पडला होता. (प्रतिनिधी)
।दोन महिन्यांपूर्वीच रचला होता कट
अमोल या कंपनीत कार्यरत होता, तर आकाश हा माजी कर्मचारी होता. हवी असलेली शिफ्ट मिळत नसल्याचे कारण सांगत त्याने तीन महिन्यांपूर्वी नोकरी सोडली होती.त्यानंतर अमोलने तेथे आकाशला कामाला लावले होते. त्यामुळे आकाशने अमोल व उमेशच्या मदतीने योजना आखून हा दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाले.हा दरोडा टाकण्यापूर्वीही त्यांनी दोन वेळा प्रयत्न केला होता. मात्र, तो फसल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले.
।महासंचालकांकडून कौतुक
आधी दोन हजार कोटींचे इफेड्रिन ड्रग रॅकेट प्रकरण आणि आता दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या मुळापर्यंत पोहोचून ते तातडीने उघडकीस आणणाऱ्या ठाणे पोलिसांचे कौतुक करण्यासाठी महासंचालक प्रवीण दीक्षित मुद्दाम ठाण्यात आले होते.