विधिमंडळात योगासनाचे क्लासेस कोणी घेतं का..? सभापती महोदय कोणी उत्तर देईल का...बाबुरावचे पत्र
By अतुल कुलकर्णी | Published: March 6, 2022 09:28 AM2022-03-06T09:28:10+5:302022-03-06T09:28:58+5:30
Maharashtra Adhiveshan: सध्या विधिमंडळात जे काही चालू आहे ते पाहता आमच्यासारख्या बाहेरून काम करणाऱ्यांना तिथे जे काही चालू आहे तेच बरोबर आहे, असे वाटते. पण ते बरोबर आहे की नाही हे आमच्यासारख्या सामान्य माणसांना कसे कळणार?
- अतुल कुलकर्णी
माननीय अध्यक्ष, सभापती,
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्या दोन दिवसात काय घडले ते आम्ही पाहिले. त्या निमित्ताने हे पत्र लिहावे वाटले. सभापती, महोदय, आपण कायद्याचे जाणकार आहात. अत्यंत अभ्यासू आहात. सध्या विधिमंडळात जे काही चालू आहे ते पाहता आमच्यासारख्या बाहेरून काम करणाऱ्यांना तिथे जे काही चालू आहे तेच बरोबर आहे, असे वाटते. पण ते बरोबर आहे की नाही हे आमच्यासारख्या सामान्य माणसांना कसे कळणार? आम्हाला काही प्रश्न पडले आहेत. त्याची उत्तरं कोणाकडून शोधायची हे काही केल्या कळत नाही. म्हणून हे पत्र थेट आपल्याला लिहीत आहे.
दोन दिवसापूर्वी एक आमदार शीर्षासन करताना दिसले. ते पाहून विधिमंडळाची भूमी पावन झाली असेल ना... ‘याचसाठी केला होता अट्टाहास...’ असेच भाव आपल्या मनात आले असतील ना...? विधिमंडळाच्या पायऱ्यांसमोर ज्यांनी शीर्षासन केले त्यांच्या फिटनेसबद्दल आम्हाला काही विचारायचे नाही. पण त्यांच्या मतदारसंघाच्या फिटनेसचे काय? त्यासाठीच तर ते विधानभवनात येतात ना...? मग त्यासाठी ते कधी वेळ देतात? अनेक आमदार पायऱ्यांवर बसलेले दिसतात. ते पायऱ्यांवर बसण्यासाठी विधानभवनात येतात की सभागृहात बसून सरकारला जाब विचारण्यासाठी..? हा प्रश्न आम्ही कुणाला विचारायचा..? टीव्हीवर आम्ही विधिमंडळाचे कामकाज पाहतो. आमदार पायऱ्यांवर उभे असतात. चक्कलस करतात. त्याला आमचा आक्षेप असण्याचे कारणही नाही. मात्र काहीजण पाय उचलून अंगविक्षेप करताना दिसतात. काही आमदार चित्रविचित्र आवाज काढत असतात. कोणी म्याऊ म्याऊ म्हणते... कोणी हाडहूड करते... काहीजण जोरदार घोषणाबाजी करत बाहेरच फिरत राहतात. ही सगळी लोकशाहीची आयुधं आहेत असे आम्हाला सांगितले जाते. मात्र ही अशी आयुधं कोणत्या पुस्तकात लिहिली आहेत? आणि ती कशी वापरायची याची माहिती कोणत्या पुस्तकात आहेत. ते पुस्तक आम्हाला शोधून द्यायला तुम्ही मदत कराल का..?
सभाग्रृहात बसल्यानंतर कुठलेही बॅनर आणू नये... कोणताही मजकूर लिहिलेले कपडे परिधान करु नयेत, असे नियम आहेत असेही आम्हाला कोणीतरी सांगितले होते. मात्र परवा अनेक सदस्य, मंत्री घोषणा लिहिलेल्या टोप्या घालून भाषण करत होते. काहीजण सभागृहात बॅनर घेऊन येतात. हे सगळं कोणत्या नियमानुसार चालते..? याचा तपशीलही आम्हाला दिला तर बरं होईल.
कोणत्या घटनेचा निषेध कसा करायचा? कोणी राष्ट्रगीत न ऐकताच निघून गेले तर त्याचा निषेध करायचा की कौतुक करायचे? याची माहिती कोणत्या पुस्तकात मिळेल? एक कल्पना आम्हाला सहज सुचली आहे. ती राबवता येईल का? नाहीतरी राष्ट्रवादीचे आ. संजय दौंड यांनी शीर्षासन करुन दाखवले आहेच. त्यामुळे आता अन्य पक्षांच्या आमदारांची वेगवेगळे आसनं करण्याची स्पर्धा घेतली तर...? तसेच काहींची वेगवेगळे आवाज काढण्याची स्पर्धा घ्यावी. यापुढे सरकारचा निषेध करण्यासाठी अशाच अभिनव कल्पना राबवाव्यात. एखादी गोष्ट पटली नाही की कधी वक्रासन, कधी भुजंगासन करून निषेध करावा. फारच नाही पटली तर सभागृहातच शवासन करायला सांगावे. म्हणजे गदारोळही होणार नाही. आवाजाचे प्रदूषणही थांबेल, शिवाय जोरदार निषेधही नोंदवला जाईल. असे काही करता येईल का आपल्याला...? हल्ली अधिवेशन पाहून खूप नवनव्या कल्पना सुचू लागल्या आहेत.
जाता जाता शेवटचे. काेणत्या प्रसंगी काेणते याेगासन करावे? तारस्वरात कसे ओरडावे? त्याचे घशावर काय व कसे परिणाम होतात...? यावर विधिमंडळात क्लासेस घेतात का? आम्हाला शिकायचे आहे... असे मला नाट्य, सिने क्षेत्रातील काही कलावंतांनी विचारले. जी काही फी असेल ती आम्ही देऊ, असेही ते म्हणत होते... तेव्हा त्यांना काय सांगू...?
आपलाच,
बाबूराव