पंकजा मुंडे भाजप सोडून काही वेगळ करतील हे वाटत नाही : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 10:35 AM2019-12-03T10:35:23+5:302019-12-03T10:36:18+5:30
याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्या पक्षातच राहणार असून त्या पक्षांतर करणार या अफवा असल्याचे सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते.
मुंबई - दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे सध्या नाराज आहेत. या बाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळी कारणे दिली जात असून त्या आपली भूमिका जाहीर करणार आहेत. एवढच नाही तर त्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना पंकजा भाजप सोडतील असं वाटत नाही.
पंकजा मुंडे यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा यांचा पराभव केला. त्यामुळे पंकजा मुंडे सभागृहात नाही. मात्र विधान परिषदेत त्यांचा प्रवेश होऊ शकतो. त्याला भाजप किती अनुकूल आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. त्यातच आपण 12 डिसेंबर रोजी आपली भूमिका स्पष्ट करू असं त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान पंकजा भाजप सोडणार यावर शरद पवारांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, पंकजा भाजपच्या चौकटीतून बाहेर जातील असं वाटत नाही. मात्र पक्षातील सहकाऱ्यांनीच त्यांच्या पराभवासाठी प्रयत्न केल्याचा त्यांचा समज असावा. कदाचित राज्यातील नेतृत्वाविषयी त्यांची तक्रार असू शकते, असंही पवार यांनी नमूद केले.
याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्या पक्षातच राहणार असून त्या पक्षांतर करणार या अफवा असल्याचे सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते.