"हा पैसा यांच्या बापाचा आहे का?", लाडकी बहीण योजनेवरील रवी राणांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 05:39 PM2024-08-12T17:39:36+5:302024-08-12T17:45:00+5:30
Vijay Wadettiwar : रवी राणा यांनी हे शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांच्या मनातलं बोललं आहे. रवी राणांचं वक्तव्य महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान आहे, त्याबद्दल सरकारनं माफी मागावी, अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे.
Vijay Wadettiwar : छत्रपती संभाजीनगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणारआहे. या योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्ट रोजी जमा होणार आहे. त्यामुळं राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अशातच या योजनेवरुन अमरावतीतील आमदार रवी राणा यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. आम्हाला आशीर्वाद दिला नाही तर लाडक्या बहिणींच्या खात्यातून १५०० परत घेण्यात येतील, असं धक्कादायक वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं आहे. रवी राणांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
रवी राणा यांनी हे शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांच्या मनातलं बोललं आहे. रवी राणांचं वक्तव्य महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान आहे, त्याबद्दल सरकारनं माफी मागावी, अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते. विजय वडेट्टीवार म्हणाले, हा सरकारचा पैसा आहे. हा पैसा यांच्या बापाचा आहे का? रवी राणा की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा आहे? असा सवाल करत यांची निती दिसली. निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी योजना आणली. बहिणींना फसवण्यासाठी योजना आणली, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
रवी राणा जे बोलले ते सरकारच्या मनातील आहे. शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या मनातलं रवी राणा बोलले आहेत. मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी. आमच्या बहिणी दीड हजार रुपयाला मत विकतील का? हा महाराष्ट्रातील महिलांचा अपमान आहे. बहिणीचा अपमान आहे. ही योजना मतांसाठी आणली होती, सरकारनं राज्यातील बहिणीची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
रवी राणा नेमकं काय म्हणाले?
आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेचे १५०० रुपये हे आम्ही दुप्पट म्हणजे ३ हजार रुपये करू, तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मात्र, ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही, तर मी तुमचा भाऊ म्हणून ते १५०० रुपये तुमच्या खात्यातून वापस घेणार, असे वक्तव्य रवी राणांनी केलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळा आज अमरावतीत रवी राणा यांनी घेतला होता. या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं. ज्याचं खाल्लं त्याचं जागलं पाहिजे. सरकार देत राहतं, पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे, असंही मत रवी राणा यांनी यावेळी मांडलं.