उद्धव ठाकरे पक्ष चालवतात की संजय राऊत?; जिल्हाप्रमुखाचा थेट सवाल, प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 12:25 IST2025-01-16T12:24:06+5:302025-01-16T12:25:07+5:30
स्वबळाचा पक्षाचा आदेश पाळेल परंतु ज्यापद्धतीने जे बाहेरचे लोक पक्षात आले त्यांचा मानसन्मान होतो, निष्ठावंतांना डावलले जाते. त्यामुळे ते शिवसैनिक नाराज आहेत असं जिल्हाप्रमुखांनी सांगितले.

उद्धव ठाकरे पक्ष चालवतात की संजय राऊत?; जिल्हाप्रमुखाचा थेट सवाल, प्रकरण काय?
नागपूर - संजय राऊत हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते पक्षाची भूमिका मांडत असतात परंतु ते अशी काही वक्तव्ये करतात ज्यातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत की नाही, पक्ष उद्धव ठाकरे नाही तर संजय राऊत चालवतात अशी विधाने ते करतात अशा शब्दात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांनी राऊतांवर निशाणा साधला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एका मुलाखतीत किशोर कुमेरिया म्हणाले की, संजय राऊत नागपुरात आले आणि स्वबळाची घोषणा केली. नागपूर शहरातील कुठल्याही जुन्या शिवसैनिकाशी त्यांनी चर्चा किंवा बैठक घेतली नाही. मी नागपूरमध्ये एकमेव शिवसेनेचा ४ टर्म नगरसेवक निवडून आलो आहे. मी जिल्हाप्रमुख आहे. पक्षाचे नेते म्हणून संजय राऊतांना वक्तव्य करण्याचा अधिकार आहे. परंतु जुन्या शिवसैनिकाशी चर्चा करणे असं काही पक्षात होत नाही. त्यामुळे शिवसैनिक नाराज आहेत. निष्ठावान आणि कर्मठ शिवसैनिक पक्ष सोडून गेले. मी ज्या भागातून निवडून आलो, तिथे जनता माझ्यावर प्रेम करते. ४ वेळा नगरसेवक बनवले. मी महानगरप्रमुख असताना ९ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर २००७ पासून २०२२ पर्यंत माझ्यावर कुठलीही जबाबदारी देण्यात आली नाही असा आरोप त्यांनी केला.
तसेच २०२२ मध्ये माझ्याकडे जिल्हाप्रमुख देण्यात आले त्यावेळी ज्या भागातून मी निवडून येतो तो विधानसभा मतदारसंघ माझ्याऐवजी दुसऱ्याच्या ताब्यात दिला जे ५ पक्ष बदलून आलेत. निष्ठावान आणि सच्चा कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करतोय. मातोश्रीवर अनेकदा उद्धव ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु चर्चाही नाही, भेटही नाही. अद्याप त्यावर तोडगा नाही. शिवसैनिक पक्षाच्या कार्यप्रणालीवर नाराज आहेत. स्वबळाचा पक्षाचा आदेश पाळेल परंतु ज्यापद्धतीने जे बाहेरचे लोक पक्षात आले त्यांचा मानसन्मान होतो, निष्ठावंतांना डावलले जाते. त्यामुळे ते नाराज आहेत. सरकार असताना ३०-३५ वर्ष काम करणाऱ्याला काहीच मिळाले नाही जे मिळाले ते बाहेरच्या लोकांना दिले असं जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांनी सांगितले.
दरम्यान, संजय राऊत नागपूरात आले, एका जिल्हाप्रमुखाशी चर्चा, समन्वय साधला आणि मी दुसरा जिल्हाप्रमुख असताना मला बोलावले नाही. चर्चा नाही. जुन्या शिवसैनिकांना बोलावले नाही. त्यामुळे ती नाराजी आणि खंत आमच्या मनात आहे. १५ वर्षाने मला जिल्हाप्रमुखपद दिले. त्यानंतर एक महिन्यातच ज्या विधानसभेच्या वार्डातून मी ४ वेळा निवडून आलो तेच माझ्या ताब्यातून काढून घेतले. ५ पक्ष बदलून आलेल्यांना ती विधानसभा दिली याची खंत आहे. मी सातत्याने उद्धव ठाकरेंना परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु भेट झाली नाही आणि चर्चा नाही असंही किशोर कुमेरिया यांनी म्हटलं.