कोल्हापुरात साकारतेय श्वान वसतिगृह
By admin | Published: April 2, 2017 12:50 AM2017-04-02T00:50:09+5:302017-04-02T00:50:09+5:30
नेत्रदीप सरनोबत यांचा पुढाकार : मालक बाहेरगावी गेल्यास सोय होणार
तानाजी पोवार --कोल्हापूर --लाखो रुपये किमतीचे जातिवंत श्वान पाळण्याची क्रेझ कोल्हापुरात चांगलीच वाढू लागली आहे; पण बाहेरगावी जाताना या श्वानांना कुठे ठेवायचे, याची मोठी अडचण अनेकांना भासू लागली आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी कोल्हापुरात सर्वसोयींनीयुक्त श्वान वसतिगृह साकारत आहे. चेन्नई, उटी, बंगलोर, मुंबईनंतर प्रथमच ही योजना कोल्हापुरात सुरू होत आहे. कोल्हापूर म्हणजे खवय्यांचे गाव, बैलगाड्या शर्यती, म्हशींसह रिक्षा सौंदर्य स्पर्धा होय. याच कोल्हापूरकरांना श्वानांचेही तितकेच वेड. लाखों रुपयांचे जातिवंत श्वान याच कोल्हापुरात पाहायला मिळतात. काहीजण जातिवंत पैदास निर्माण करून शौक पुरा करतानाच आर्थिक फायदाही मिळवतात. त्यामुळे कोल्हापूरमध्ये या श्वानासाठी खाद्यापासून त्यांच्या आरोग्य, प्रशिक्षणापर्यंतच्या अनेक सोयी उपलब्ध झाल्या आहेत. याच श्वानांसाठी त्याच्या प्रेमापोटी कोल्हापूर महानगरपालिकेचे शहर अभियंता म्हणून नेत्रदीप सरनोबत हे वसतिगृह साकारत आहेत; सरनोबत हे स्वत: श्वानप्रेमी असून त्यांच्याकडे सध्या ‘गोल्डन रिट्रिव्हा’ जातीची तीन आणि ‘रॉट विलर’ या जातीचा एक असे एकूण चार किमती, जातिवंत श्वान आहेत. या चार श्वानांवर त्यांचा अतोनात जीव जडला आहे नव्हे, हे श्वान म्हणजे त्यांच्या घरातील सदस्यच बनले आहेत. प्रचंड धावपळीत असतानाही दररोज सकाळी आणि सायंकाळी त्यांनी ठरावीक वेळ या श्वानांसाठी राखूनच ठेवला आहे.
ते आॅफिस कामासाठी बाहेरगावी जात असल्याने या श्वानांच्या पालनपोषणासाठी अडचणी येत होत्या. त्याचवेळी श्वानांच्या वसतिगृहाची (डॉग होस्टेलिंग) नवी कल्पना त्यांना सुचली. त्यानुसार त्यांनी हे वसतिगृह निर्माण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी त्यांना त्यांचे मित्र संजय राजहंस, डॉ. अनिल पाटील, डॉ. अरुण शिंत्रे तसेच श्वान प्रशिक्षक सहकार्य करत आहेत.
कळंबा कारागृहाच्या पिछाडीस सरनोबत यांच्या निवासस्थानानजीकच त्यांनी सुमारे १० गुंठे जागा या श्वान वसतिगृहासाठी घेतली असून, त्यासाठी महानगरपालिकेकडे परवाना प्रक्रिया सुरू केली आहे तसेच ही योजना कॅनॉन क्लबकडे नोंदणीकृत करण्यात आली आहे. या श्वान वसतिगृहामुळे सहा ते सात श्वान प्रशिक्षकांना काम मिळणार आहे.
श्वानांची विशेष काळजी
वसतिगृहाच्या जागेत श्वानांसाठी वेगवेगळे विभाग करण्यात येत आहेत तसेच श्वानांना व्यायाम करण्यासाठी छोटासा स्वीमिंग पूलही साकारत आहे. त्यांच्या रोजच्या सरावासाठी स्वतंत्र ट्रॅक असेल. या वसतिगृहातील प्रत्येक श्वान विभाग हा संसर्गमुक्त असेल. त्यासाठी तेथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत त्यांची विशेष काळजी घेतली जाणार आहे.
बिनधास्तपणे बाहेरगावी जावे
घरात किमती जातिवंत श्वान असणारे कुटुंब श्वानांना सोडून बाहेरगावी जाऊ शकत नाही, पण आठ-दहा दिवस अथवा पंधरा दिवस बाहेरगावी जाणाऱ्यांसाठी श्वान वसतिगृह ही पर्वणीच ठरणार आहे. प्रतिदिन ठरावीक रक्कम भरून श्वानांना वसतिगृहात ठेवून आता बिनधास्तपणे बाहेरगावी जाता येणार आहे. वसतिगृहात श्वान जमा करताना त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येते. त्यानंतर त्या श्वानाचे वय, वजन पाहून त्याप्रमाणे त्याला खाद्य दिले जाते.
मुंबईनंतर कोल्हापुरात
अमेरिका, हाँगकाँग या दोन देशांत श्वानप्रेमींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे तेथे अशा पद्धतीने श्वानांसाठी वसतिगृहे उपलब्ध आहेत; तर भारतात चेन्नई, ऊटी, बंगलोर, मुंबई येथेही श्वान वसतिगृहे आहेत. कोल्हापुरात हे असे श्वान वसतिगृह प्रथमच साकारले जात आहे.