निवाऱ्याअभावी कुत्री भटकीच
By Admin | Published: August 3, 2016 12:47 AM2016-08-03T00:47:29+5:302016-08-03T00:47:29+5:30
श्वानदंश रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पुणे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले
पुणे : शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून, श्वानदंश रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पुणे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. यावर नियंत्रण येण्यासाठी २ वर्षांपूर्वी पालिकेतर्फे शहराच्या ४ भागांत भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभारण्यात येणार होती. मात्र अद्याप केवळ दोनच शेल्टर कार्यरत असल्याने श्वानदंशांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या पालिकेच्या रुग्णालयांत दर महिन्याला दीड हजारहून अधिक रुग्ण हे केवळ कुत्र्याच्या चाव्यामुळे आले असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. जानेवारी २०१६ पासून मे २०१६ पर्यंत ८४९० जणांना शहरातील विविध भागांत श्वानदंश झाला असल्याचे यामधून स्पष्ट होते.
दोन वर्षांपूर्वी पालिकेत झालेल्या ठरावानुसार ४ ठिकाणी कुत्र्यांचे शेल्टर करण्यात येणार होते. मात्र, दोन वर्षे होऊनही अद्याप केवळ दोनच ठिकाणी हे शेल्टर सुरू झाले आहेत. यामध्ये केशवनगर येथील मुंढवा येथे व नायडू रुग्णालयाच्या आवारातील शेल्टर कार्यरत झाले आहेत. यामध्ये अॅनिमल बर्थ कंट्रोल रुल २००१ या कायद्यानुसार कुत्र्यांची नसबंदी करण्यात येते. तसेच त्यांचे लसीकरणही करण्यात येते, अशी माहिती महापालिकेतील सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अमित शहा यांनी दिली.
ते म्हणाले, ‘‘या दोन्ही ठिकाणी मिळून सध्या दिवसाला ५० ते ६० कुत्र्यांचे लसीकरण व नसबंदी केली जात आहे. सध्या या कामासाठी पालिकेकडे दोन्ही मिळून ८ एकर
जागा उपलब्ध असून, वर्षाला
६० लाख इतका निधी या कामासाठी मंजूर करण्यात आला आहे. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेतर्फे वेळोवेळी विविध कार्यक्रमही घेण्यात येत आहेत. बालेवाडी येथे तिसरा प्रकल्पाचे
काम चालू असून, येत्या वर्षभरात
तो पूर्ण होईल अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहायक प्रभारी उपआरोग्य
अधिकारी डॉ. अंजली साबणे यांनी सांगितले.
डॉ. साबणे म्हणाल्या, की सध्या शहरातील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याचे काम पालिका प्रशासनाबरोबरच ४ स्वयंसेवी संस्थांना देण्यात आले आहे. शेल्टरच्या प्रकल्पासाठी आणखी मोकळ्या जागेचा शोध चालू असून, ती मिळाल्यास हे काम आणखी वेगाने चालू होईल. पालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये रेबिजविरोधी लस उपलब्ध करण्यात आली असून, या लसीचा अतिरिक्त साठाही पालिकेने उपलब्ध केला आहे.
कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबिज आणि त्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची या वर्षातील संख्या १५ आहे. रेबिजच्या रुग्णांचे उपचार पुण्यातील नायडू रुग्णालयात होतात.