कुत्रे पिसाळले - उद्धव ठाकरेंचे आशिष शेलारांवर टीकास्त्र

By Admin | Published: July 13, 2015 09:22 AM2015-07-13T09:22:23+5:302015-07-13T11:56:37+5:30

महाराष्ट्र व देशाच्या हितासाठी आम्ही काही बाबी परखडपणे मांडतो, मात्र काही राजकीय येडबंबूना सत्तेची सुस्ती आल्याने त्यांची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे झाली असे मानायचे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी आशिष शेलांवर टीका केली आहे.

Dogs Threatened - Uddhav Thackeray's Lecture on Ashish Shelar | कुत्रे पिसाळले - उद्धव ठाकरेंचे आशिष शेलारांवर टीकास्त्र

कुत्रे पिसाळले - उद्धव ठाकरेंचे आशिष शेलारांवर टीकास्त्र

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १३ - महाराष्ट्र व देशाच्या हितासाठी आम्ही काही बाबी परखडपणे मांडतो, मात्र काही राजकीय येडबंबूना सत्तेची सुस्ती आल्याने त्यांची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे झाली असे मानायचे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी आशिष शेलांवर टीका केली आहे. तसेच फडणवीस सरकार हे शिवसेनेच्या पाठिंब्यावर चालत असल्याची आठवण करून देत महाराष्ट्राच्या अस्मितेबाबात काहीही वाकडे झाल्यास लोकांच्या अंगावर येणा-या पिसाळलेल्या कुत्र्यांचा समाचार घेऊ असा कडक इशाराही त्यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून दिला आहे. 

राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपा व शिवेसेनेतील अंतर्गत कुरबुरी अद्यापही कायम आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतल्यावरून शिवसेनेने केलेल्या टीकेनंतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर लक्ष देण्यापेक्षा मुंबई महपालिकेकडे लक्ष द्या असा सल्ला प्रत्युत्तरदाखल भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी दिला होता. नाईट-लाईफ आणि नाईट-मार्केटच्या मुद्यावरूनही दोन्ही पक्षांत चांगलीच जुंपली असतानाच आज 'सामना'तून अत्यंत खालच्या पातळीच्या शब्दांत आशिष शेलारांवर टीका करण्यात आल्याने भडका उडण्याची चिन्हे दिसत आहेत.  
 
काय म्हटले आहे अग्रलेखात :
- काही लोकांना डोळे उघडल्यावर हिंदुस्थानच्या खदखदणार्‍या सीमा दिसतात. पाकड्यांचा सदैव सुरू असलेला विश्‍वासघात दिसतो. ज्यांना प्रखर राष्ट्रवादाची व देशभक्तीची दृष्टी आहे त्यांना हेच दिसणार व दिसत राहणार. हा दृष्टिदोष नसून संस्कार आहे, तर काही लोकांना दिवस-रात्र फक्त ‘गटारे’ दिसतात. पाकिस्तानचे आक्रमण महत्त्वाचे की गटारे महत्त्वाची या प्रश्‍नांवर जनमत घेतले तर लोक संस्कार व राष्ट्रभक्तीस उचलून धरतील, पण महाराष्ट्रात व देशातही सध्या एकंदरीत जो गोंधळ चालला आहे तो पाहता ‘कालचा गोंधळ बरा होता’ अशी भावना लोकात निर्माण होऊ नये. 
- या पिसाळलेल्या कुत्र्यांचे काय करायचे? डोळे न मिटता पिसाळलेल्या कुत्र्यांवर पहारा करीत बसावे की मुंबईत ज्याप्रमाणे ‘लेप्टो’ आजार पसरण्यास कारणीभूत ठरलेल्या उंदरांना मारण्याची मोहीम सुरू आहे तशी पिसाळलेल्या व चावणार्‍या कुत्र्यांना मारण्याची मोहीम सरकारने सुरू करावी? काही लोक न पिसाळताही चावतात व असे चावणे हा ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेचा परिणाम आहे काय, यावर नामदार चंद्रकांत पाटील यांनी प्रकाश टाकला पाहिजे. आम्ही काही बाबी महाराष्ट्राच्या व देशाच्या हितासाठी परखडपणे मांडतो, पण काही राजकीय येडबंबूंना सत्तेची सुस्ती व बधिरता आल्यामुळेच त्यांची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे झाली आहे असे मानायचे काय?
- राष्ट्रवादी व कॉंग्रेसवाल्यांना अजूनही वाटतेय की महाराष्ट्रातील सत्ता त्यांच्याच हाती आहे. सत्तेचे तेज व चकाकी आजही त्यांच्या लोंबणार्‍या गालफटांवर दिसते आहे, पण विद्यमान सत्ताधारी विरोधी पक्षाच्या मानसिकतेतून बाहेर पडून महाराष्ट्राला खंबीर नेतृत्व देणार नसतील तर आपल्यासारखे दुर्दैवी दुसरे कोणीच नाही. विरोधी पक्षाच्या हाती जी प्रकरणे आज लागली आहेत ते काही त्यांचे संशोधन व मेहनत नक्कीच नाही. त्यामागचे कर्तेधर्ते कुणी वेगळेच आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर उद्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. विरोधकांच्या हाती जे ‘फटाके’ किंवा ‘दारूगोळा’ दिसत आहे तो त्यांच्या हाती आयताच मिळाला आहे. विधानसभेत विरोधकांच्या भडिमारास सरकारला तोंड द्यावे लागेल असे वातावरण आहे व त्यासाठी सरकारची काय तयारी आहे?
- महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न आम्ही नव्हे तर भाजपच्याच मंत्र्यांनी उचलला आहे. आता त्यांचीही दृष्टी बिघडली आहे असे कुणास वाटत असेल तर हद्द झाली. आजपासून सुरू होणार्‍या अधिवेशनात चिक्की प्रकरण, राज पुरोहित-लोढा यांचे ‘सीडी’ प्रकरण, मंत्र्यांचे ‘डिग्री’ प्रकरण, गृहराज्यमंत्र्यांच्या ‘नावा’चा घोळ असे अनेक विषय येतील व संपूर्ण अधिवेशन पुन्हा गोंधळात वाहून जाईल. फडणवीस सरकार हे शिवसेनेच्या पाठिंब्यावर चालले आहे व शिवसेनेला लोकांना जाब द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे. 
- शिवसेनेचा जन्म फक्त सत्तेसाठी नसून आम्हाला सत्ता हवी आहे ती लोककल्याण, महाराष्ट्राची अस्मिता व राष्ट्राच्या रक्षणासाठी. त्यामुळे याबाबत काही वाकडेतिकडे झाल्यास आम्ही डोळे मिटूनही शत्रूंचा समाचार घेऊ व लोकांच्या अंगावर येऊन चावणार्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त करू. प्रश्‍न डोळे मिटण्याचा व उघडण्याचा नाही, डोळे उघडे ठेवून ‘बजबजपुरी’ निर्माण करण्यापेक्षा डोळे मिटून राष्ट्रहिताची स्वप्ने पाहणे चांगले. अर्जुनाने डोळे मिटूनच माशाचा डावा डोळा फोडला होता व रावणाने डोळे उघडे ठेवून उचललेले शिवधनुष्य त्याच्याच छाताडावर पडले होते. समझनेवालों को इशारा काफी है!
 

 

Web Title: Dogs Threatened - Uddhav Thackeray's Lecture on Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.