राज्यातील अंध गायकांची 'डोळस' आषाढीवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 03:03 PM2020-06-27T15:03:04+5:302020-06-27T15:07:34+5:30
कोरोना विषाणूमुळे प्रत्यक्ष जाता येत नसले तरी राज्यातील १० अंध गायकांनी अनोख्या पद्धतीने आषाढीवारी सुरु केली आहे.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : कोरोना विषाणूमुळे प्रत्यक्ष जाता येत नसले तरी राज्यातील १० अंध गायकांनी अनोख्या पद्धतीने आषाढीवारी सुरु केली आहे.
प्रेरणा असोसिएशन फॉर दी ब्लाईंड या संस्थेच्या ह्यआषाढी वारी २०२०ह्ण या ऑनलाईन कार्यक्रमात भक्तिगीते आळवित कोल्हापूरसह पुणे, मुंबई, नाशिक जिल्ह्यांतील १० निवडक अंध गायकांनी श्रोत्यांना वारीतील विठ्ठलाचे 'डोळस' सांगितिक दर्शन घडविले. आज, शनिवारपासून हा उपक्रम २ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन झूम अँपद्वारे आज, शनिवारी सकाळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्यासह अनेकजण उपस्थितीत पार पडले.
कार्यक्रमासाठी सुस्मिता कण्हेरी आणि ऋतुजा देसाई यांनी तांत्रिक सहकार्य केले आहे, तर प्रेरणा असोसिएशनचे पदाधिकारी सुनील रांजणे, दिलावर शेख, पराग कुंकूलोक, हणमंत जोशी यांनी इतर जबाबदारी उचलली.
संध्या सुळे यांनी देव माझा विठूसावळा, कोल्हापूरचा सिध्दराज पाटील याने अवघे गरजे पंढरपुर तर श्रध्दा घोंगडे हिने पांडूरंग कांती, संगिता पाटील हिने धरिला पंढरिचा चोर, सारिका शिंदे हिने भावभोळ्या भक्तीची, तेजल व्यास यांनी भेटीलागी जीवा, ब्रम्हदेव काटे याने किती तुझी वाट पाहू, सचिन पिसाळ याने इंद्रायणी काठी देवाची आळंदी, निकिता सोनकांबळे हिने सुंदर ते ध्यान, डाँ.दिव्या बिजुर यांनी खेळ मांडियेला ही गाणी गायिली. या सर्वांनी स्वत:च्या घरात या गीतांचे रेकॉर्डिंग केले.
यूट्यूब आणि येरळावाणी रेडिओवर प्रसारण
हा आषाढीवारी २0२0'' कार्यक्रम २७ जून ते २ जुलै या कालावधीत यूट्यूबवर सकाळी ११ वाजल्यापासून श्रोत्यांसाठी उपलब्ध झाले आहे. (https://youtu.be/8PejBvt8a1g ) तर या ऑनलाईन सांगीतिक उपक्रमाचे प्रसारण येरळा वाणी कम्युनिटी रेडिओवर (९१.२) त्यांच्या नियमित प्रसारणामध्ये सुरु आहे. सांगली, जत परिसरातील रेडिओच्या श्रोत्यांना याचा लाभ होणार आहे.
भक्ती हीच शक्ती हे सार्थ ठरवीत या आगळ्यावेगळ्या सांगीतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाबरोबरच सकारात्मक संदेश देण्याचा आणि जीवनाकडे पाहण्याचा उन्नत दृष्टिकोनदेखील अनुभवण्यास मिळणार आहे.
- सतीश नवले,
सचिव, प्रेरणा असोसिएशन फॉर दी ब्लाईंड