अखेर ‘डॉलर’चा झाला ‘रुपया’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2017 05:03 AM2017-02-08T05:03:44+5:302017-02-08T05:03:44+5:30
राज्य निवडणूक आयोगाच्या त्रुटींमुळे कागदोपत्री ‘डॉलरपती’ झालेले उमेदवार अखेर ‘रुपयाधीश’ झाले आहेत. महानगरपालिका निवडणुकांच्या शर्यतीत
नागपूर : राज्य निवडणूक आयोगाच्या त्रुटींमुळे कागदोपत्री ‘डॉलरपती’ झालेले उमेदवार अखेर ‘रुपयाधीश’ झाले आहेत. महानगरपालिका निवडणुकांच्या शर्यतीत असलेल्या उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातील संपत्ती ‘डॉलर’मध्ये व सर्वांचे शिक्षण ‘बीए पास’ दाखविण्यात आले होते. ‘लोकमत’ने ही बाब उघडकीस आणल्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने संकेतस्थळावरील ही चूक दूर केली.
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रत्येक उमेदवाराने दाखल केलेले शपथपत्र उपलब्ध करून देण्यात आले होते. निवडणुकांसाठी दाखल केलेल्या प्रत्येक प्रतिज्ञापत्रात उमेदवारांच्या संपत्तीचा उल्लेख हा रुपयांऐवजी चक्क ‘डॉलर’मध्ये करण्यात आला होता. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका लढवत असलेल्या उमेदवारांची संपत्ती ‘डॉलर्स’मध्ये दाखवत असल्याने प्रत्येक जण ६७ पटींनी श्रीमंत असल्याचे दिसून येत होते. शिवाय उमेदवाराचे शिक्षण कितीही झाले असले तरी प्रतिज्ञापत्रातील सारांश तपशीलात सर्वांचे शिक्षण ‘बीए पास’ असेच दाखविण्यात येत होते. ‘लोकमत’ने ही बाब उघडकीस आणल्यानंतर निवडणूक आयोगाचे डोळे उघडले. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी गंभीर नोंद घेतली व बैठका घेऊन तांत्रिक चमूला या त्रुटी हटविण्याचे निर्देश दिले. संकेतस्थळावरून राज्यातील सर्वच महानगरपालिकांच्या उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे दर्शविणारी ‘लिंक’हटविण्यात आली. (प्रतिनिधी)