डोंबिवलीला कॉर्पोरेट लूक?
By admin | Published: August 4, 2016 01:49 AM2016-08-04T01:49:26+5:302016-08-04T01:49:26+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली पूर्वेतील विभागीय कार्यालयाचा लवकरच पुनर्विकास केला जाणार आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली पूर्वेतील विभागीय कार्यालयाचा लवकरच पुनर्विकास केला जाणार आहे. महापालिकेच्या स्वनिधीतून हा विकास करणे अशक्य असल्याने खासगीकरणातून हे काम करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या अंतर्गत येथील प्रभाग कार्यालयांचेही विकेंद्रीकरण केले जाणार आहे. एकंदरीतच कॉर्पाेरेट लूक लाभणाऱ्या नव्या वास्तूत बहुमजली वाहनतळ उभारण्याचाही प्रस्ताव आहे. महासभेच्या मान्यतेनंतरच या कार्यवाहीला प्रारंभ होणार आहे.
केडीएमसीचे डोंबिवली विभागीय कार्यालय हे रेल्वे स्थानकानजीक अतिशय गजबजलेल्या ठिकाणी आहे. सध्या रेल्वे स्थानक परिसरात होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे होणाऱ्या अडचणींचा विचार करता या जागेचा वापर नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी करण्याच्या दृष्टीने या वास्तूचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या प्रभाग क्षेत्र कार्यालयाची स्थापना होण्यापूर्वी या जागेवर अस्तित्वात असलेल्या इमारतीत तत्कालीन डोंबिवली नगरपालिका व कालांतराने महापालिकेचे डोंबिवली विभागीय कार्यालय म्हणून वापर होऊ लागला. प्रभाग क्षेत्रांची निर्मिती झाल्यानंतर डोंबिवली पूर्वेकडील ‘फ’ आणि ‘ग’ प्रभाग क्षेत्रांसाठी याच कार्यालयाचा सध्या वापर होत आहे.
दरम्यान, जागेचे महत्त्व व महापालिका प्रशासकीय कामकाजाची सोय व विभागीय कार्यालयाचे विकें द्रीकरण करण्यासाठी संबंधित ‘फ’ आणि ‘ग’ प्रभाग क्षेत्र कार्यालये त्या त्या प्रभाग क्षेत्रांत मध्यवर्ती ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ‘फ’ प्रभागाचे कार्यालय पी. पी. चेंबर, तर ‘ग’ प्रभागाचे कार्यालय गांधीनगर येथे हलवण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
विभागीय कार्यालयाचा पुनर्विकास करताना मुख्य वास्तूत सुसज्ज वाहनतळ उभारण्यात येणार आहे. येथे सरकारी आणि खासगी कार्यालयांसाठीही जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नागरिकांना वाहनतळाचा फायदा होईल, त्याचबरोबर सुनियोजित वास्तू उभारल्यास शहराच्या सुशोभीकरणात भर पडेल. (प्रतिनिधी)
>सध्या दोन शाळा,
विभागीय कार्यालय
सध्या महापालिका विभागीय कार्यालयाच्या भूखंडावर के. बी. वीरा शाळा व महापालिकेच्या शाळेची इमारतही आहे. याव्यतिरिक्त उर्वरित जागेवर डोंबिवली विभागीय कार्यालयाची इमारत आहे. या एकत्रित भूखंडाचे क्षेत्रफळ अंदाजे ६५६९.२० चौरस मीटर इतके आहे.
>खाजगीकरणातून प्रकल्प उभारणे सोयीचे
विभागीय कार्यालयाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी तो खासगीकरणाद्वारे केला जाणार आहे. सध्या महापालिकेकडील आर्थिक स्थितीचा विचार करता हा प्रस्तावित प्रकल्प महापालिकेला स्वनिधीतून उभारणे कठीण असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले
आहे.
या जागेचा मूलभूत आणि आर्थिकदृष्ट्या योग्य प्रकारे वापर करण्यासाठी खासगीकरणातून हा प्रकल्प उभारणे सोयीस्कर असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. धोरणात्मक निर्णयासाठी येत्या महासभेत हा प्रस्ताव दाखल होणार असल्याने त्याला लोकप्रतिनिधींची कितपत
पसंती मिळेल, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल.