डोंबिवलीतील स्फोट रिअ‍ॅक्टरचा!

By Admin | Published: May 29, 2016 12:40 AM2016-05-29T00:40:36+5:302016-05-29T00:40:36+5:30

प्रोबेस एंटरप्रायझेस केमिकल कंपनीत झालेला स्फोट बॉयलरचा नसून रिअ‍ॅक्टरचा असल्याची माहिती एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचे वरिष्ठ अभियंता मिलिंद ओगले यांनी दिली.

Dombivli explosion Reactor! | डोंबिवलीतील स्फोट रिअ‍ॅक्टरचा!

डोंबिवलीतील स्फोट रिअ‍ॅक्टरचा!

googlenewsNext

डोंबिवली : प्रोबेस एंटरप्रायझेस केमिकल कंपनीत झालेला स्फोट बॉयलरचा नसून रिअ‍ॅक्टरचा असल्याची माहिती एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचे वरिष्ठ अभियंता मिलिंद ओगले यांनी दिली.
बॉयलर स्फोटाची तीव्रता एवढी भीषण असू शकत नाही. ज्या वेळी रिअ‍ॅक्टरचा स्फोट झाला, त्या वेळी त्यामध्ये सुमारे १० हजार लीटरहून अधिक केमिकल असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. स्फोटानंतर बेपत्ता असलेल्या मयूरेश वायकोळे यांचा मृतदेह ढिगाऱ्याखाली सापडल्याने या स्फोटातील बळींची संख्या शनिवारी १२ झाली. दुर्घटनेतील ४७ जखमी विविध रुग्णालयांत उपचार घेत असून त्यापैकी १४ जणांची प्रकृती अद्याप गंभीर आहे.
प्रोबेस कंपनीच्या ढिगाऱ्यात शनिवारी सकाळी अल्कोहोल गळतीची समस्या उद्भवल्याने ढिगारे उपसण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला. सुमारे १०० लीटरचा अल्कोहोलसदृश रसायनाचा ड्रम बाहेर काढताना मदतकार्य करणाऱ्या पथकाला समस्या जाणवल्याने काही काळ काम संथगतीने सुरू होते. बेपत्ता वायकोळे यांचा मृतदेह शनिवारी सकाळी सापडला. दुर्घटनेच्या केवळ एक दिवस अगोदर म्हणजे बुधवारी ते कंपनीत हेल्परपदावर रुजू झाले होते.
शुक्रवारी पंधराहून अधिक रसायनांचे ड्रम बाहेर काढण्यात आले. त्यामध्ये एक ड्रम रसायनाने भरलेला होता. त्यामध्ये सुमारे ३५० लीटरपेक्षा अधिक रसायन असल्याचा अंदाज आहे. जेथे स्फोट झाला, तेथे आणखी काही मृतदेह असण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ढिगाऱ्याखाली दबलेले रसायनांचे ड्रम काढताना कोणताही अपघात होऊ नये, यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने सलग दुसऱ्या दिवशीही ५०० मीटर परिसरातील नागरिकांना घरे खाली करण्यास सांगितले होते.
डोंबिवली एमआयडीसीचे फॅक्टरी निरीक्षक विक्रम कातमवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अल्कोहोल आणि मिथेनॉलचा साठा हस्तगत केल्याचे स्पष्ट केले. मात्र, तपशील देण्यास नकार दिला.
दुर्घटनेतील काही मोजके गंभीर जखमी वगळता उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. मात्र, मृतांच्या नातेवाइकांना मृतदेह
ताब्यात घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून त्यास विलंब लागत असल्याने रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. शुक्रवारपासून नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले असून शनिवारी संध्याकाळपर्यंत सुमारे तीन हजार घरांचे, तर २४ कंपन्यांचे पंचनामे झाल्याची माहिती तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिली. (प्रतिनिधी

वाहतुकीची विशेष व्यवस्था
प्रोबेस कंपनीच्या आवारात सापडलेले ज्वालाग्राही रसायनांचे १५ ड्रम शनिवारी सायंकाळी विशेष सुरक्षा व्यवस्थेत वाहतूक पोलिसांनी निळजे येथे नेले. ज्या रस्त्यावरून हे ड्रम नेण्यात आले, त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी विशेष वाहतूक व्यवस्थेचे नेतृत्व केले.

दोषारोपपत्रावरच समाधान मानावे लागणार
सागर्लीतील प्रोबेस एंटरप्रायझेसमध्ये गुरुवारी झालेल्या रिअ‍ॅक्टरच्या स्फोटात त्या कंपनीचे मालक सुमित वाकटकर यांचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेप्रकरणी त्यांच्याविरोधात जरी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असला तरीही त्या केसमध्ये केवळ अहवाल सादर करण्यापुरतेच दोषारोपपत्र दाखल करण्यावर पोलीस यंत्रणेला समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.
कंपनीचे मालकच त्या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडल्याने त्याबाबतची चौकशी, नेमकी माहिती उपलब्ध होणार नसल्याने तपासकामात अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे गुन्हा जरी दाखल झालेला असला तरी केवळ दोषारोपपत्र दाखल करण्याशिवाय फारसे काही होईल, हे सांगता येत नसल्याचे एका वरिष्ठ तपासाधिकाऱ्याने सांगितले.
कंपनीत नेमकी कोणकोणती रसायने होती, त्यात नेमका किती कच्चा माल होता, स्फोटक असे कोणते रसायन होते, नेमके किती कर्मचारी होते, यासह अनेक तांत्रिक बाबींची माहिती मिळवताना अडथळे येत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Dombivli explosion Reactor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.