डोंबिवलीतील पादचारी पूल रखडला
By admin | Published: April 27, 2016 04:03 AM2016-04-27T04:03:48+5:302016-04-27T04:03:48+5:30
डोंबिवली आणि मुंब्रा रेल्वे स्थानकातील पादचारी पुलांच्या डागडुजीचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे
डोंबिवली : डोंबिवली आणि मुंब्रा रेल्वे स्थानकातील पादचारी पुलांच्या डागडुजीचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी एप्रिल महिना सुरू होताच मुंब्रा स्थानकातील मधला, तर डोंबिवली स्थानकातील मुंबईच्या दिशेकडील रेल्वेचे पादचारी पूल प्रवाशांसाठी पूर्णत: बंद करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेने हे काम २५ एप्रिलपर्यंत चालेले, असे म्हटले होते. मात्र तो कालावधी संपूनही पूल वाहतुकीस खुला झालेला नाही. त्याला आणखी आठवडा लागणार असल्याची माहिती समोर येत आहे.
डोंबिवलीत या पुलाचा वापर करणाऱ्या रामनगरसह पश्चिमेकडील पं. दिनदयाळ रोड व कोपर रोडच्या प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यांना मधल्या ब्रिजपर्यंत यावे लागत असल्याने विशेषत: सकाळच्या वेळेत प्रवासाचे नियोजन कोलमडते. त्यामुळे काम वेळेत पूर्ण करण्याची त्यांची मागणी आहे.
डोंबिवली स्थानकातील पादचारी पुलाच्या डागडुजीचे काम ५ ते २५ एप्रिलपर्यंत होणे अपेक्षित होते, मात्र अद्यापही ते झालेले नाही. या कामामुळे जमा झालेले रेबीट (उपयोगात नसलेला माल) स्थानकातच पुलाखाली व मोकळया जागेत ठेवण्यात आले आहे.
मुंब्रा स्थानकातही कल्याण दिशेकडील पुलाचे काम सुरु आहे. ते लवकर पूर्ण व्हावे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.