डोंबिवलीत प्लास्टिकची चिनी अंडी
By admin | Published: April 6, 2017 03:30 AM2017-04-06T03:30:30+5:302017-04-06T03:30:30+5:30
चिनी बनावटीची प्लास्टिकचे आवरण असलेली अंडी विकली जात असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
डोंबिवली : कोलकाता आणि चेन्नई येथे चिनी बनावटीच्या प्लास्टिकच्या नकली अंड्यांची विक्री केली जात असल्याचे अलीकडेच उघडकीस झाले असतानाच आता डोंबिवलीमध्येही तशीच चिनी बनावटीची प्लास्टिकचे आवरण असलेली अंडी विकली जात असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी येथील पंचऋषी संकुलातील वसिष्ठ बिल्डिंगमध्ये राहणारे शिक्षक अमेय गोखले यांनी मंगळवारी रात्री १० च्या सुमारास अनंत निवास इमारतीच्या खालील संदेश पानबिडी शॉपमधून अर्धा डझन अंडी विकत घेतली. त्यातील दोन अंड्यांचे गोखले यांनी आमलेट केला असता उग्र वास येऊ लागला. त्यांनी आमलेट खाण्याचा प्रयत्न केला, तर ते च्युइंगमसारखे वातड लागल्याने गोखले यांना
संशय आला. त्यामुळे त्यांनी अंड्याचे कवच नीट निरखून पाहिले असता त्यांना ते प्लास्टिकचे असल्याचे दिसून आले.
खातरजमा करण्याकरिता त्यांनी दुसरे अंडे फोडले असता त्यातही त्यांना प्लास्टिकचे आवरण आढळले. अंड्यातील बलक व पांढरा भाग तव्यावर टाकल्यावर वातड होत असल्याचे दिसले. त्यांनी ती अंडी तशीच ठेवली. रात्र झाल्याने ज्या दुकानातून अंडी खरेदी केली होती, ते दुकान बंद झाले होते. काही दिवसांपूर्वी कोलकाता आणि चेन्नई येथे चिनी बनावटीची प्लास्टिकची नकली अंडी विक्रीस आल्याची बातमी यू ट्यूबवर पाहिल्याची आठवण गोखले यांना झाली. गोखले यांनी ही अंडी बुधवारी पत्रकारांना दाखवली. याबाबत, आपण पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याचे गोखले यांनी सांगितले.
याबाबत, संदेश पानबिडी दुकानाचे मालक एस.बी. शेट्टी यांना विचारले असता ते म्हणाले की, इतर कोणाची अंड्यांबाबत तक्रार आलेली नाही. आपल्या दुकानातून दररोज १०० ते १२५ अंडी विकली जातात. अंड्यांबाबत तक्रार असल्याचे गोखले यांनी सायंकाळी सांगितले. आता अंड्यांच्या होलसेल पुरवठादाराकडे आपण तक्रार करणार आहोत. (प्रतिनिधी)
>डोंबिवलीतील शिक्षक अमेय गोखले यांनी मंगळवारी रात्री आणलेली अंडी प्लास्टिकची असल्याचे लक्षात आल्यावर त्यातील वातड अंश त्यांनी सर्वांना दाखविला. याबाबत कारवाई होण्याची गरज असल्याचे ते वारंवार सांगत होते.
डोंबिवलीतील
अंड्यातील कवचासोबतचा भाग प्लास्टिकचा असल्याचे निष्पन्न झाले. ती अंडी आणि त्यावरील आवरण.