डोंबिवलीत पोलीसांनी १८ बेवारस दुचाकी केल्या जप्त :रामनगर भागात केली कारवाई *
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 04:43 PM2017-10-30T16:43:44+5:302017-10-30T16:49:36+5:30
बेवारस १८ दुचाकींवर सोमवारी शहर वाहतूक नियंत्रण विभाग आणि रामनगर पोलिसांच्या पथकाने संंयुक्तकारवाई केली. अन्य २० वाहन चालकांवर नो पार्किंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली.
डोंबिवली: वर्षानूवर्षे रस्त्याच्या कडेला असंख्य दुचाकी, चारचाकी वाहने उभी असतात. रोजच्या वापरात ती वाहने नसल्याने परिसरातील रहिवासी त्या गाड्या रस्त्यावर ठेवतात. अशा अनेक वर्षे एकाच जागेवर ठेवलेल्या वाहनांची अडगळ झाल्याने त्यात पावसाचे पाणी, कचरा साचतो. त्यामुळे परिसरातील रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, अशा बेवारस १८ दुचाकींवर सोमवारी शहर वाहतूक नियंत्रण विभाग आणि रामनगर पोलिसांच्या पथकाने संंयुक्तकारवाई केली. अन्य २० वाहन चालकांवर नो पार्किंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली.
रामनगर भागातील टाटा पॉवर लाईनच्या रस्त्यावर असंख्य वाहने रात्रंदिवस उभी असतात. त्यातील बहुतांशी वाहने बेवारस असून त्यामुळे परिसराला बकाली आली आहे. त्याचा त्रास परिसरातील रहिवाश्यांना होत असून ठिकठिकाणी वाहने असल्याने तेथे कमालीची अस्वच्छता झाली असून रहिवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वर्षानूवर्षे एकाच जागी पडलेल्या वाहनांवर जप्तीची कारवाई करा असे पत्र कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे सभागृह नेते, नगरसेवक राजेश मोरे यांनी ९ सप्टेंबर तर स्मरणपत्र १० आणि २९ आॅक्टोबर रोजी दिले होते. त्यानूसार शहर वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलिस निरिक्षक गोविंद गंभीरे, रामनगरचे पोलिस निरिक्षक नारायण देशमुख यांच्यासह कर्मचा-यांनी १८ बेवारस वाहने ताब्यात घेतली. जप्त केलेल्या गाड्या वर्षानूवर्षे तेथे पडुन होत्या. बहुतांशी वाहनांचे, टायर, हँडल, सीटकव्हर, पेट्रोलच्या टाक्या यांसह अन्य पार्टस हे निकामी झाले होते. त्यांची मालकी नेमकी कोणाकडे आहे याबाबतची माहिती द्यायला कोणीही पुढे आले नाही. कारवाई करतांना ज्या वाहनांच्या मालकांनी ओळख पटवून स्वत: वाहने हालवणार असल्याचे अथवा दुरुस्त करुन चालवणार असल्याचे सांगितले, अशांवर दंडात्मक कारवाई करुन ती वाहने सोडण्यात आली. पण ज्यांची ओळख पटवायला कोणीही आले नाही अशा वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली.
रामनगर पोलीसांनी त्याचा जागेवर पंचनामा करुन ती वाहने ताब्यात घेतली. आधी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि त्यानंतर आधी जेथे टिळकनगर पोलीस ठाणे होते त्या मोकळया जागेत जप्त केलेली वाहने ठेवण्यात आल्याचे गंभीरे म्हणाले. ज्या वीस वाहनांची ओळख पटवण्यात आली, त्या वाहन चालकांवर नो पार्किंगच्या नियमाखाली प्रत्येकी २०० रुपये दंडात्मक कारवाई केल्याचे गंभीरे म्हणाले. अशी बेवारस वाहने जेथे असतील तेथे अशा पद्धतीने कार्यवाही सतत सुरु असते, पण स्थानिक पोलीसांचे त्यात सहकार्य आवश्यक असते, ते मिळाले की पंचानाम करण्यासह अन्य तांत्रिक बाबींमध्ये सहाय्य घेतले जाते असेही ते म्हणाले.
-------------