भाजपा-सेनेतील ‘शोले’चा डोंबिवलीत शो
By admin | Published: June 28, 2016 02:52 AM2016-06-28T02:52:57+5:302016-06-28T02:52:57+5:30
भाजपा व शिवसेना या दोन सत्ताधारी पक्षांत सध्या राज्यस्तरावर सुरू असलेली नळावरील भांडणे आता थेट सांस्कृतिकनगरीतही रंगली
अनिकेत घमंडी,
डोंबिवली- भाजपा व शिवसेना या दोन सत्ताधारी पक्षांत सध्या राज्यस्तरावर सुरू असलेली नळावरील भांडणे आता थेट सांस्कृतिकनगरीतही रंगली आहेत. डोंबिवली-ठाकुर्लीदरम्यान उड्डाणपूल उभारण्याच्या कामाचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर होताच भाजपाने या कामाचे श्रेय लाटण्याकरिता फलक लावला. लागलीच शिवसेनेने ‘करून दाखवले’चे बोर्ड लावले. महापालिकेत युती असलेल्या पक्षांचे स्वतंत्र फलक हा गावभरच्या चर्चेचा विषय झाला आहे.
विधानसभा निवडणुकीत युती तुटली. त्याचीच पुनरावृत्ती कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये झाली. केवळ वरिष्ठांचा आदेश शिरसावंद्य मानत स्थानिक आमदारांसह कार्यकर्त्यांना युती स्वीकारावी लागली. नुकत्याच झालेल्या महासभेत आणि स्थायीच्या सभेत येथील पूर्व-पश्चिम असे डोंबिवली-ठाकुर्ली जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या खर्चाला मंजुरी मिळाली.
उड्डाणपुलाच्या प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी डोंबिवलीत शहरभर मोठे होर्डिंग लागले आहेत. मात्र, त्यात युती कुठेच दिसून येत नाही, हे विशेष. सर्वात आधी भाजपाचा बोर्ड लागला. त्याला जशास तसे उत्तर म्हणून शिवसेनेने जागा मिळेल तिथे (मोक्याच्या ठिकाणी) होर्डिंग्ज लावत मित्रपक्षावर कुरघोडीचा प्रयत्न केला.
भाजपाच्या मते सध्या स्थायी समितीच्या चाव्या त्यांच्याकडे असल्याने सभापती संदीप गायकर यांनी प्रकल्पाच्या २३ कोटी ३७ लाख २८ हजार ४१३ रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली. तर, शिवसेनेच्या मते निवडणुकांपूर्वीच शिवसेनेने त्या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. तेव्हा पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे हे स्थायीचे सभापती होते. त्यामुळे हे श्रेय त्यांचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात येऊन निवडून आलेले विकास म्हात्रे यांनीही होर्डिंग्ज लावले आहेत. त्यात त्यांनी आजी-माजी सभापतींसह युतीमुळे हा प्रकल्प तडीस जात असल्याचे दर्शवले आहे.
भाजपाने मात्र आमदार रवींद्र चव्हाण यांच्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागल्याचे सांगत त्यांचे अभिनंदन केले आहे. बहुधा, तेच शिवसेनेच्या मोरेंना खटकले असून त्यासाठी त्यांनीही स्वतंत्रपणे बोर्ड लावल्याची सर्वत्र चर्चा आहे.
>विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी केडीएमसीतील भाजपाने कंबर कसली होती.
त्यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील आमदारांसह नगरसेवकांचे तोंडभरून कौतुक केले होते.
विधान परिषद निवडणुकीतील सख्य लागलीच संपुष्टात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.