डोंबिवलीत मनसेचे खड्डे बुजवा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2016 05:34 AM2016-08-24T05:34:10+5:302016-08-24T05:34:10+5:30

रस्त्यांवरील खड्डे तसेच असल्याच्या निषेधार्थ मनसेने मंगळवारी डोंबिवलीत अनोखे आंदोलन छेडले.

Dombivliat Mansa khade Buzwa movement | डोंबिवलीत मनसेचे खड्डे बुजवा आंदोलन

डोंबिवलीत मनसेचे खड्डे बुजवा आंदोलन

Next


कल्याण : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही रस्त्यांवरील खड्डे तसेच असल्याच्या निषेधार्थ मनसेने मंगळवारी डोंबिवलीत अनोखे आंदोलन छेडले. प्रतीकात्मक गणपती बाप्पाद्वारे खड्डे बुजवण्याबरोबरच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बामच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
केडीएमसी हद्दीत पडलेल्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आंदोलन छेडले होते.
यानंतर महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या मनसेने डोंबिवली विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा
काढला. शहर अध्यक्ष मनोज घरत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विरोधी पक्षनेते प्रकाश
भोईर, नगरसेविका सरोज भोईर, परिवहन समितीचे
सदस्य प्रल्हाद म्हात्रे आदींसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
फडके रोडजवळील मनसेच्या डोंबिवली शहर कार्यालय परिसरातून निघालेला मोर्चा महापालिकेच्या विभागीय कार्यालयावर धडकला. तेथे प्रतीकात्मक गणपतीद्वारे खड्डे बुजवण्यात आले. या वेळी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलकांनी ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरतीही म्हटली. या वेळी मनसेच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांची
भेट घेतली. शहरात जागोजागी खड्डे पडले
असून, नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. खड्ड्यांमुळे नाहक बळी जाऊनही प्रशासनाला अजून जाग
आलेली नाही. खड्ड्यांमुळे मानेचे विकार, पाठदुखीचा आजार बळावला आहे. रस्ते सुस्थितीत आणता
येत नसतील तर नागरिकांना बामच्या बाटल्या तरी वाटा, असे सुनावत शिष्टमंडळाने बामच्या बाटल्या पाटील यांना भेट दिल्या. (प्रतिनिधी)
>मनसेचे वरातीमागून घोडे
राष्ट्रवादीने शहरातील खड्ड्यांच्या समस्येवर नुकतीच स्वाक्षरी मोहीम राबवली होती, तर कल्याणमध्ये चक्कीनाका येथे काँग्रेसने बेमुदत उपोषण सुरू केले होते. यात गणेशोत्सव सुरू व्हायला जेमतेम १० ते १२ दिवस शिल्लक असताना मंगळवारी मनसेने छेडलेले आंदोलन म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती.
मागील महिन्यात खड्ड्यांचे प्रदर्शन भरवून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न मनसेने प्रथम केला. त्यामुळे वरातीमागून घोडे म्हणणे चुकीचे असल्याचे मनोज घरत म्हणाले.
रात्रीही बुजवणार खड्डे : मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्यानंतर महापालिका हद्दीतील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता रात्रीही खड्डे बुजवण्याचे काम केले जाईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला. गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेविरहित असतील, असेही ते म्हणाले.

Web Title: Dombivliat Mansa khade Buzwa movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.