डोंबिवलीच्या धाडसी महिलेने चोराला पकडले

By admin | Published: May 12, 2017 03:22 AM2017-05-12T03:22:56+5:302017-05-12T03:22:56+5:30

बसमध्ये चढताना पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरणाऱ्या चोरावर डोंबिवलीतील एका महिलेने सतत सात दिवस पाळत ठेवून त्याला पोलिसांच्या हवाली केले.

Dombivli's brave woman caught a thief | डोंबिवलीच्या धाडसी महिलेने चोराला पकडले

डोंबिवलीच्या धाडसी महिलेने चोराला पकडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बसमध्ये चढताना पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरणाऱ्या चोरावर डोंबिवलीतील एका महिलेने सतत सात दिवस पाळत ठेवून त्याला पोलिसांच्या हवाली केले. चोरीचा तपास स्वत:च करून चोराला पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या या धाडसी महिलेने समाजाला सजग राहण्याची शिकवण यातून दिली आहे.
अकोल्याचे सामाजिक कार्यकर्ता सागर सिद्दीकी यांच्या कन्या सबा सिद्दीकी लग्नानंतर डोंबिवली येथे स्थायिक झाल्या. पर्यटन व्यवसायात असलेल्या सबा ३ मे रोजी डोंबिवलीतील राहत्या पलावा सोसायटीजवळून वाशी-कल्याणमध्ये बसमध्ये बसल्या. बसमध्ये चढताना त्यांची पर्स चोराने पळवली. त्यात सुमारे ७ हजार रुपये, ओळखपत्र, एटीएमसह इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. पर्स हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी बसमध्ये पर्सची शोधाशोध सुरू केली. बसमध्ये चढताना त्यांच्यामागेच एक प्रवासी चढला आणि बस सुरू होण्यापूर्वीच गडबडीत उतरला. त्यानेच पर्स चोरी केली असावी, अशी शंका काही प्रवाशांनी व्यक्त केली. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असून त्याचे फुटेज कल्याण-डोंबिवली पालिकेतून मिळवण्याचा सल्ला बसच्या वाहकाने दिला. त्यानुसार सबा सिद्दीकी देसाईनाक्याजवळ बसमधून उतरल्या. त्यानंतर, त्या आणि पती डॉ. शेख दोघेही त्यांच्या सोसायटीजवळच्या बसथांब्यावर आले. तिथे त्यांना बसमध्ये त्यांच्या मागून चढणारी ती व्यक्ती दिसली. सबा यांना पाहताच घाबरून त्याने मोटारसायकलवरून पळ काढला. दोघांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, सबा यांनी मानपाडा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी हद्दीचा प्रश्न उपस्थित करून त्यांना शीळ-डायघर पोलीस ठाण्यामध्ये जाण्याचा सल्ला दिला. डायघर पोलिसांनी तक्रार लिहून घेतली आणि त्यांना बसमधील सीसी कॅमेऱ्याचे फुटेज देण्यासंदर्भात पालिकेच्या नावे पत्रही दिले. सबा यांनी महत्प्रयासाने फुटेज मिळवले. या फुटेजमध्ये आरोपी त्यांच्या बॅगमधून पैशाची पर्स काढताना स्पष्ट दिसला.
सभा यांनी आरोपीची माहिती काढण्यास सुरुवात केली असता, तो त्यांच्याच सोसायटीत भाड्याने राहत असल्याचे समजले. त्यानंतर, सबा यांनी त्याच्यावर पाळत ठेवली. मंगळवारी तो सोसायटीतील किराणा दुकानावर दिसला. त्यांनी लगेच पती, काही मित्रमैत्रिणी आणि पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. आरोपीला गाठून चोरीबाबत विचारणा केली. त्याने सबा यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या घाबरल्या नाहीत. त्याला वादात गुंतवून ठेवले. पोलीस तिथे येताच त्यांच्या स्वाधीन केले. त्योच नाव रूपेश लोखंडे असून तो मूळचा सोलापूरचा आहे. त्याने गुन्ह्याची कबुली त्याने दिली असून सबा यांची कागदपत्रेही परत केली.
सखोल तपासाची गरज-
पोलिसांनी रूपेश लोखंडे याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्याजवळ चोरीच्या १० ते १२ बॅग आढळल्या. याशिवाय लोकांची ओळखपत्रे, पॅनकार्ड आणि अनेक एटीएमही पोलिसांना सापडले.
काही अमली पदार्थही या आरोपीच्या घरात सापडले आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची गरज आहे, असे मत सबा सिद्दीकी यांनी व्यक्त केले आहे.
मानसिकता बदलण्याची गरज-
नियमानुसार कोणत्याही घटनेची तक्रार कोणत्याही पोलीस ठाण्यात देणे शक्य आहे. त्यामुळे पोलिसांनी हद्दीचे कारण देऊन सबा सिद्दीकी यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ करणे योग्य नव्हते.
सीसी कॅमेऱ्याचे फुटेज मिळवून काय करणार, चोर एकाच ठिकाणी थांबत नाही, चोरी झालेली कागदपत्रे नव्याने तयार करून घ्या, आपण आधीच सतर्क राहायला हवे, असे सल्ले पोलिसांनी सबा सिद्दीकी यांना दिले. ही नकारात्मक मानसिकता पोलिसांनी बदलण्याची गरज असल्याचे सिद्दीकी म्हणाल्या.

Web Title: Dombivli's brave woman caught a thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.