डोंबिवलीत पर्यावरणाची ‘सायकल’

By admin | Published: June 5, 2017 03:28 AM2017-06-05T03:28:47+5:302017-06-05T03:28:47+5:30

पर्यावरण दिन आला की, अनेक जण एका दिवसापुरती सायकल चालवतात.

Dombivlit Environmental 'Cycle' | डोंबिवलीत पर्यावरणाची ‘सायकल’

डोंबिवलीत पर्यावरणाची ‘सायकल’

Next

जान्हवी मोर्ये।
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पर्यावरण दिन आला की, अनेक जण एका दिवसापुरती सायकल चालवतात. मात्र, ‘डोंबिवली सायकल क्लब’चे सदस्य ३६५ दिवस सायकल चालवून सुदृढ आरोग्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहेत. त्यामुळे पाच वर्षांत सायकल चालवणाऱ्यांची तसेच क्लबच्या सदस्यांची संख्या वाढली आहे. या क्लबचे अनेकांनी अनुकरण केल्यास भविष्यात त्याचे चांगले परिणाम दिसतील, अशी अपेक्षा पर्यावरण दिनानिमित्ताने व्यक्त होत आहे.
डोंबिवली सायकल क्लबचे डॉ. सुनील पुणतांबेकर म्हणाले की, क्लबची सुरुवात ५ फेब्रुवारी २०१२ ला झाली. आज सदस्यांची संख्या १५० वर आहे. त्यात वय वर्षे नऊ ते ७९ वयापर्यंतची मंडळी आहेत. क्लबचे सदस्य रोज सायकलने फेरफटका मारतात. परंतु, प्रत्येक रविवारी सदस्य न चुकता भेटून सकाळी ६ ते ८.३० दरम्यान किमान १५ किलोमीटरचा प्रवास करतात. काही सदस्य तर बदलापूर, शीळफाटा इथपर्यंत सायकलने प्रवास करतात. गणेश मंदिरापासून सायकल चालवण्यास सुरुवात होते. क्लबचे सदस्य विश्वनाथ अय्यर व शशांक वैद्य हे दोघे जण अधूनमधून ठाणे व नवी मुंबईत कामावर जाताना सायकलने जातात.
सायकल प्रवासाबरोबरच क्लबचे सदस्य झाडे जगावीत, ती वाचावीत, यासाठी प्रयत्नशील आहेत. सायकलवरून भ्रमंती करताना ते आजूबाजूच्या गावांत फळांच्या बिया फेकतात. पावसाळ्यात तेथे झाडे उगवतात. एक दिवस सायकल चालवून भागत नाही. त्यात सातत्य हवे. तर, आरोग्य चांगले राहते, असे सदस्यांचे म्हणणे आहे.
क्लबने डोंबिवली शहरात सायकलला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. सायकल क्लबमध्ये इतर कोणताही विषय चर्चिला जात नाही. सायकलविषयीच माहिती दिली जाते. कोणती सायकल खरेदी करावी, तिची दुरुस्ती व देखभाल कशी करावी, यावर अधिक भर दिला जातो. आता मोटारसायकल, स्कूटर चालवणाऱ्यांचे प्रमाण भरमसाट वाढले आहे. त्यामुळे वायुप्रदूषण होते. ते सायकलकडे वळल्यास प्रदूषण रोखता येईल.
आज वृक्षारोपण
पुणतांबेकर यांनी स्वत: २०११ मध्ये मुंबई ते गोवा हा प्रवास सायकलवरून केला आहे. क्लबच्या सदस्या ममता परदेशी यांनीही मुंबई ते पणजी सायकलप्रवास केला आहे.
पर्यावरण दिनानिमित्त क्लबतर्फे उद्या सोमवारी झाडांची रोपे लावली जाणार आहेत. त्या झाडांची निगारणीही करण्याचा प्रयत्न क्लबतर्फे यंदाच्या वर्षापासून केला जाणार आहे.

Web Title: Dombivlit Environmental 'Cycle'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.